अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा 5 विकेटने रोमांचक पराभव केला. रवींद्र जडेजा चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला, तर फक्त दोन बॉलमुळे गुजरातला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला मोहित शर्मा व्हिलन झाला. चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 रनची गरज होती. पहिल्या चार बॉलमध्ये मोहित शर्माने फक्त तीन रन दिल्या, त्यामुळे गुजरात लागोपाठ दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकेल असं वाटत होतं, पण त्याच वेळी जडेजानं मॅच फिरवली. शेवटच्या दोन बॉलला 10 रनची गरज असताना जडेजाने पाचव्या बॉलला सिक्स आणि सहाव्या बॉलला फोर मारत चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन बनवलं. मोहित शर्माचं यंदाचं आयपीएल स्वप्नवतच राहिलं, पण त्याला गुजरातला विजयी बनवता आलं नाही. पराभवानंतर मोहितला मैदानातच रडू कोसळलं, यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला सावरलं. फायनलमधल्या या कामगिरीनंतर मोहित शर्माने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण आयपीएलमध्ये मी तेच केलं, पण यावेळी बॉल जिकडे पडू नये तिकडेच पडला आणि जडेजानं बॅटने जे करायचं होतं ते केलं. मी माझं सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न केला,’ असं मोहित शर्मा म्हणाला. चौथ्या बॉलपर्यंत गुजरात विजयी होईल असं वाटत होतं, पण तेव्हाच गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याने मोहित शर्मासाठी ड्रेसिंग रूममधून काहीतरी सबस्टिट्यूट खेळाडूकडे संदेश पाठवला. यानंतर अनेकांनी आशिष नेहरावरही टीका केली आहे. मोहित शर्माने मात्र यामध्ये आशिष नेहराचा दोष नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, फायनल जिंकल्यानंतर नवी अपडेट ‘पुढचे बॉल कसे टाकणार आहेस? याची माहिती त्यांना हवी होती. मी यॉर्कर टाकेन असं सांगितलं. मला काय करायचं होतं ते मला माहिती होतं. आता लोक उगाच या गोष्टी बोलत आहे, यामध्ये काहीही तथ्य नाही,’ असं वक्तव्य मोहित शर्माने केलं आहे. ‘या निकालामुळे मी रात्रभर झोपलो नाही. हा निकाल पाहिजे तसा लागला नसला तरीही संपूर्ण मोसमातल्या कामगिरीबद्दल समाधानी आहे. माझ्याकडे काहीही नसताना गुजरातने मला संधी दिली. रात्रभर झोपलो नाही, विचार करत होतो, काय वेगळं करता आलं असतं,’ असं मोहित म्हणाला. मागच्या 4 वर्षांमध्ये मोहित शर्मा फक्त एक मॅच खेळला होता, त्यानंतर 2022 च्या लिलावात त्याला कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं. गुजरातने मोहितला नेटबॉलर म्हणून संधी दिली आणि या मोसमात तो गुजरातच्या टीममध्ये आला. राशिद खानसोबत मोहित या मोसमातला सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू ठरला. राशिद आणि मोहितला प्रत्येकी 27-27 विकेट घेतल्या. तर गुजरातचाच मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. मोहम्मद शमीला संपूर्ण मोसमात 28 विकेट मिळाल्या. विजयानंतर धोनी झाला भावुक, जडेजाला उचलून घेताच मिटले डोळे, झिवा बिलगली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.