मुंबई, 29 मार्च : आयपीएल 2022 च्या मोसमाला (IPL 2022) सुरूवात झाली आहे. लीगची सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबईने (Mumbai Indians) पहिल्याच सामन्यात पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 4 विकेटने पराभव झाला. 2013 पासून लागोपाठ 10 वर्ष मुंबईचा मोसमाच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. या मोसमात झालेला पराभव पचवून मुंबईची टीम पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरली. मुंबई इंडियन्सच्या सरावासाठी टीमचा आयकॉन आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) सहभागी झाला. सचिनचा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधला एक व्हिडिओ टीमने सोशल मीडियावर शेयर केला आहे. खेळाडूंसोबत चर्चा करण्यासाठी उत्साही असल्याचं वक्तव्य सचिनने या व्हिडिओमध्ये केलं आहे. सचिन तेंडुलकरला या व्हिडिओमध्ये झहीर खान ट्रेनिंगमध्ये बॉलिंग करत असल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा सचिनने मजेशीर प्रतिक्रिया दिली. झहीर जर बॉलिंग करत असेल तर मलाही बॅटिंगसाठी उतरावं लागेल. झहीर बॅटिंग करणार असेल तर मी बॉलिंग करेन, असं सचिन या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. झहीर खान (Zaheer Khan) हा मुंबई इंडियन्स टीमचा डायरेक्टर क्रिकेट ऑपरेशन आहे.
Guess who's out for training! 🤩
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2022
Paltan, होऊ द्या आवाज - "Sachin... Sachin!" 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @sachin_rt MI TV pic.twitter.com/9YLxpeX8R1
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 2 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण टीमचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव फिट होऊन मैदानात उतरू शकतो. पहिल्या सामन्यात टीमला सूर्याची कमी जाणवली होती.