मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा (MI vs CSK) 5 विकेटने पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 98 रनच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने (Mumbai Indians) 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून केला, या पराभवासोबतच सीएसकेची प्ले-ऑफला पोहोचण्याची शेवटची आशाही मावळली आहे. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यासाठी मुंबईने कायरन पोलार्डला (Kieron Pollard) बाहेर केलं. पोलार्डऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला संधी देण्यात आली.
12 मे हा पोलार्डचा वाढदिवस आहे, 35व्या वाढदिवशीच पोलार्डला टीमबाहेर करण्याचा कठोर निर्णय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) घ्यावा लागला. आयपीएलच्या या मोसमात पोलार्डने बॅट आणि बॉलने संघर्ष केला. 11 सामन्यांमध्ये त्याने 14.40 च्या सरासरीने आणि 107.46 च्या स्ट्राईक रेटने फक्त 144 रन केले, याशिवाय त्याने 4 विकेट घेतल्या.
रोहितची प्रतिक्रिया
भविष्याचा विचार करता पोलार्ड बाहेर आहे, त्याच्याऐवजी स्टब्स आणि मुरुगन अश्विनऐवजी ऋतिक शौकीनला संधी देण्यात आली. पोलार्ड आजही मॅच खेळण्यासाठी तयार होता, पण आम्हाला काही खेळाडूंना संधी देऊन पाहायचं होतं, ते कशी कामगिरी करत आहेत ते. पोलार्डला टीमबाहेर असल्याचं समजलं तेव्हा तो आला आणि मी यासाठी तयार आहे, असं तो म्हणाल्याची प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.
कायरन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. आयपीएलच्या सगळ्या मॅच पोलार्ड मुंबईकडून खेळला आहे. त्याने 189 आयपीएल सामन्यांमध्ये 28.67 च्या सरासरीने आणि 147.32 च्या स्ट्राईक रेटने 3,412 रन केले आहेत, यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. 87 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी आयपीएल सुरू असतानाच वेस्ट इंडिजचा कर्णधार असणाऱ्या पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबईने पोलार्डला 6 कोटी रुपयांना रिटेन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, Kieron pollard, Mumbai Indians, Rohit sharma