मुंबई, 28 मार्च : दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या (Deepak Hooda Krunal Pandya) यांच्यात मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मोठा वाद झाला. हे भांडण एवढं मोठं होतं की दीपक हुड्डाने बडोद्याची टीमच सोडली. या सगळ्या वादानंतर दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) एकाच टीमकडून खेळत आहेत. लखनऊ सुपर जाएंट्सच्या (Lucknow Super Giants) पहिल्याच सामन्यात हुड्डा आणि कृणाल यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या लखनऊला सुरूवातीलाच धक्के बसले, पण दीपक हुड्डा आणि आयुष बदोणी यांनी अर्धशतकं करत लखनऊला सावरलं. हुड्डाने 41 बॉलमध्ये 55 रन केले तर बदोणी 41 बॉलमध्ये 54 रन करून आऊट झाला. कृणाल पांड्या 13 बॉलमध्ये 21 रनवर नाबाद राहिला. लखनऊची बॅटिंग सुरू असताना दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या यांना एकत्र बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही, पण गुजरातची बॉलिंग सुरू होताच या दोघांचं वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळालं. गुजरातची बॉलिंग सुरू झाल्यानंतर इनिंगच्या तिसऱ्याच बॉलला दुष्मंता चमिराने शुभमन गिलला शून्यवर आऊट केलं. दीपक हुड्डाने शुभमन गिलचा कॅच पकडला, यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांनी एकमेकांना मिठी मारली. कृणाल आणि दीपक यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय झाला होता वाद? मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मात्र हुड्डावर शिस्तभंगाची कारवाई करत एका वर्षासाठी निलंबन केलं. बडोद्यानं निलंबन केल्यानंतर हुड्डानं राजस्थानकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली होती. टीम इंडियाकडून समाधानकारक कामगिरी केलेल्या हुड्डाला लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) 5 कोटी 75 लाखांना खरेदी केले. तर लखनऊने कृणाल पांड्यासाठी 8 कोटी 25 लाख रूपये मोजले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.