नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : सध्या आयपीएल 2021चा (IPL 2021) दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात अनेक नवे खेळाडू आपलं कौशल्य सिद्ध करताना दिसत आहेत. अर्थात यात प्राधान्यानं नाव आहे ते व्यंकटेश अय्यरचं. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा अत्यंत गुणी क्रिकेटर (Cricketer) आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वतःमध्ये अनेक लहान-मोठे बदल केले. तो सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) चाहता आहे. सौरव गांगुलीच्या खेळण्याच्या शैलीला आदर्श मानून त्यानं स्वतःच्या शैलीत एक मोठा बदल केला. या बदलाची माहिती व्यंकटेशनं एका व्हिडिओच्या माध्यमातून नुकतीच दिली. लहानपणी उजव्या हातानं फलंदाजी करणारा हा क्रिकेटपटू आता डाव्या हातानं फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारताना दिसत आहे. त्याची या मागील प्रेरणाही सौरव गांगुलीच ठरला आहे. केकेआर टीमचा (KKR Team) युवा बॅट्समन व्यंकटेश अय्यरनं आयपीएलमध्ये धमाकेदार पदार्पण केलं आहे. गुरुवारी (23 सप्टेंबर) आयपीएल 2021मधील एका मॅचमध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 30 बॉल्समध्ये 53 रन्स काढून धमाकेदार खेळी केली. यापूर्वीदेखील या डावखुऱ्या बॅट्समननं आरसीबी (RCB) संघाविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये 27 बॉल्समध्ये नाबाद 41 रन्स केले होते. 26 वर्षांच्या व्यंकटेश अय्यरनं क्रिकेटर म्हणून उजव्या हातानं बॅटिंग सुरू केली होती. परंतु, टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यामुळे त्यानं आपली बॅटिंग स्टाइल बदलली. आयपीएलनं शेअर केलेल्या एका व्हिडिओत व्यंकटेश अय्यरनं सहकारी क्रिकेटर राहुल त्रिपाठीशी बोलताना आपल्या बदललेल्या बॅटिंग स्टाइलविषयी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या या खेळाडूनं सांगितलं, `मी लहान होतो, तेव्हा मी उजव्या हातानं बॅटिंग करत असे. परंतु, ‘दादां’नी ज्याप्रमाणं बॅटिंग करताना फोर आणि सिक्सर्स लगावले त्याची मी नक्कल करू इच्छित होतो. त्यांनी माझ्या आयुष्यात नकळत मोठी भूमिका बजावली आहे. मी एका चांगल्या संधीची वाट पाहत होतो आणि मला माहीत होतं की संधी नक्की मिळेल.` हे ही वाचा- RCB vs CSK : 152 KMPH च्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या बॉलरला विराट देणार संधी! `केकेआरकडूनच खेळू इच्छित होतो` `अगदी इमानदारीत सांगायचं, तर केकेआर ही पहिली टीम आहे, की जिच्यासाठी मला खेळायचं होतं. याचं कारण सौरव गागुंली होते. सुरुवातीला ते केकेआरचे कॅप्टन होते. जेव्हा मी या फ्रॅन्चायझीसाठी निवडला गेलो, तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी होती. केकेआरमध्ये माझं जोरदार स्वागत झालं. जगभरात सौरव गांगुली यांचे लाखो फॅन्स आहेत, त्यापैकीच मी एक आहे,` असं व्यंकटेश अय्यरनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.