मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा; पाहा, राष्ट्रकुलमधली भारताची कामगिरी

CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा; पाहा, राष्ट्रकुलमधली भारताची कामगिरी

बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा

बर्मिंगहॅममध्ये डौलानं फडकला तिरंगा

CWG 2022: भारतानं यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह 61 पदकं जिंकली. पदकतालिकेत भारत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडापाठोपाठ चौथ्या स्थानावर आहे.

बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: इंग्लडच्या बर्मिंगहॅममध्ये 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दिमाखात पार पडली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक पदकं जिंकून आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. पण भारतीय अथलीट्सनीही ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, कॅनडासारख्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर दिल्ली आणि भारतीय तिरंगा डौलानं फडकवला.  यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात गोल्ड कोस्ट इतकी पदकं जमा झाली नाहीत. त्याला काही कारणंही आहेत. पण तरीही भारतीय खेळाडूंची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.

भारतानं यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह 61 पदकं जिंकली. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.

कुस्तीत भारताला सर्वाधिक पदकं

बर्मिंगहॅममध्ये भारताला सर्वात जास्त पदकं मिळवून दिली ती पैलवानांनी. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे 12 पैलवान सहभागी झाले होते. आणि या बाराही जणांनी राष्ट्रकुलचं पदक पटकावलं. त्यात सहा जणांनी सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे.

यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक विजेते पैलवान –

बजरंग पुनिया – सुवर्ण (65 किलो)

साक्षी मलिक – सुवर्ण (62 किलो)

दीपक पुनिया – सुवर्ण (86 किलो)

रवी दहिया – सुवर्ण (57 किलो)

विनेश फोगाट – सुवर्ण (53 किलो)

नवीन – सुवर्ण (74 किलो)

हेही वाचा - Asia Cup 2022 – आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; विराट-राहुल ‘इन’, श्रेयस आऊट

टेबल टेनिसमध्ये चार सुवर्ण

भारताला कुस्तीपाठोपाठ सर्वात जास्तय यश मिळालं ते टेबल टेनिसमध्ये. शरथ कमल आणि कंपनीनं यंदाच्या राष्ट्रकुलमधून चार सुवर्णपदकांसह वेगवेगळ्या गटात एकूण पाच पदकांची कमाई केली

वेटलिफ्टिंग-बॉक्सिंगमध्ये पदकांची रास

बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये भारताचं पदकांचं खातं खोललं ते रौप्यविजेता मराठमोळा वेटलिफ्टर संकेत सरगरनं. त्यानंतर मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शेऊलीनं सोनेरी यश संपादन केलं. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह 10 पदकं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळाली.

वेटलिफ्टिंगसह भारतीय बॉक्सर्सनीही राष्ट्रकुलमध्ये गोल्डन पंच लगावला. निखत झरीन, अमित पंघाल आणि नीतू घंघास या बॉक्सर्सनी सुवर्ण पदक भारताच्या झोळीत टाकलं. याशिवाय एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह बॉक्सिंगमध्ये भारताला सात पदकं मिळाली.

बॅडमिंटनमध्येही गोल्डन हॅटट्रिक

ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, युवा शटलर लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग या जोडीनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

हेही वाचा -  CWG 2022: सिंधूचं पदक का ठरलं भारतासाठी खास? पाहा, सिंधूच्या सोनेरी यशाचं वैशिष्ट्य

अथलेटिक्समध्येगी ऐतिहासिक यश

नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारतीय अथलीट्सनी दमदार कामगिरी बजावली. एलदोस पॉलनं तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकल. तर महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक पटकावलं. चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह अथलेटिक्समध्ये 8 सुवर्णपदकं भारताच्या खात्यात जमा झाली.

याशिवाय लॉन बॉल्स आणि पॅरा वेटलिफ्टिंगमध्येही भारताला सोनेरी यश लाभलं. हॉकी, क्रिकेटमध्येही भारताला सुवर्णपदकानं थोडक्यात हुलकावणी दिली.

नेमबाजांना वगळलं, पदकसंख्या घटली

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीचा समावेश करण्यात आला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताला सर्वाधिक पदकं ही नेमबाजीत मिळालेली आहेत. 2018 साली गोल्ड कोस्टमध्येही सात सुवर्णपदकांसह सर्वाधिक 16 पदकं ही नेमबाजीत होती. त्यामुळे नेमबाजांना संधी न मिळाल्यानं पदकतालिकेत यंदा भारताची तीनवरुन चौथ्या स्थानी घसरण झाली.

First published:

Tags: Games, Sport, Sports