बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट**:** पी. व्ही. सिंधूनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक पटकावलं. राष्ट्रकुलमध्ये तिचं हे तिसरं पदक ठरलं. सिंधूसाठी हे यश जितकं मोठं आहे तितकच ते भारतासाठीही खास आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी भारताच्या खात्यात 181 सुवर्णपदकं जमा होती. पण सिंधूचं आजच पदक हे बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये भारतानं मिळवलेलं 19वं पदक होतं. त्यामुळे भारतानं राष्ट्रकुलच्या इतिहासात पदकांचं द्विशतक पूर्ण केलं. 200 सुवर्ण मिळवणारा भारत चौथा देश 1930 साली राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झाली. कधी काळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशांचा या स्पर्धेत समावेश होतो. या स्पर्धेत आजवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा अशा देशांनी पदकांची मोठ्या प्रमाणात लूट केली आहे. पण गेल्या काही वर्षात भारतही या देशांना टक्कर देताना दिसतोय. आज भारतानं 200 सुवर्णपदकं जिंकत अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरला आहे. सर्वाधिक सुवर्णपदक विजेते देश ऑस्ट्रेलिया – 1002* इंग्लंड – 772* कॅनडा – 510* भारत – 203* हेही वाचा - CWG 2022: वयाच्या चाळीसाव्या वर्षी शरथ कमलची कमाल, जिंकलं सुवर्णपदक सिंधूपाठोपाठ लक्ष्य सेनचाही विजय भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं सनसनाटी विजयाची नोंद करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावलं. लक्ष्य सेननं अंतिम सामन्यात मलेशियाच्या झी यंगचं कडवं आव्हान तिसऱ्या सेटमध्ये मोडीत काढलं. या सामन्यात यंगनं पहिला सेट 21-19 असा जिंकून आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जोरदार कमबॅक करताना 21-09 अशा फरकानं हा सेट जिंकला. अखेरच्या सेटमध्ये लक्ष्यनं सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवली आणि हा सेटही 21-16 असा खिशात घालून सुवर्णपदकाची कमाई केली. अवघ्या 20 वर्षांचा लक्ष्य सेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा आजवरचा चौथा पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी प्रकाश पदुकोण, सय्यद मोदी, पारुपल्ली कश्यप यांनी राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण कामगिरी बजावली होती. दरम्यान लक्ष्य सेननंतर सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळे भारताची बॅडमिंटनमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.