बर्मिंगहॅम, 06 ऑगस्ट: राष्ट्रकुल क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं आतापर्यंत दमदार कामगिरी बजावली आहे. अ गटातील तीनपैकी दोन सामने जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आणि आज अंतिम फेरीच्या तिकीटासाठी हा संघ इंग्लंडशी भिडणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर उभय संघातला हा सामना खेळवण्यात येणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. साखळी फेरीनंतर भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे अव्वल संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. आणि आज याच चार संघांपैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? याचा फैसला होणार आहे.
इंग्लंडचं तगडं आव्हान
अ गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचा सेमीफायनलचा सामना ब गटात अव्वल राहिलेल्या इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडनं ब गटातील आपले तिन्ही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. इंग्लंडनं न्यूझीलंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांवर मात केली. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर नताली स्कीवरच्या या संघाचं तगडं आव्हान असेल. पण या सामन्यात भारताना इंग्लंडचा पराभव केल्यास भारताचं एक पदक पक्क होईल.
सामन्याच्या वेळेत बदल
भारत आणि इंग्लंड संघातला हा सामना नियोजित वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता खेळवण्यात येणार होता. पण उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होताच भारतीय दर्शकांसाठी सामन्यांच्या वेळेच बदल करण्यात आले आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंडदरम्यानचा सामना रात्री साडेदहाऐवजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा उपांत्य सामना साडेदहा वाजता खेळवण्यात येईल.
हेही वाचा - Commonwealth : दीपक पुनियाची पाकिस्तानला धोबीपछाड, कुस्तीमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक!
उपांत्य फेरीसाठीचा संभाव्य भारतीय संघ –
शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर
इंग्लंडचा संभाव्य संघ -
डॅनिएला वॅट, सोफिया डंकले, एलिस केप्स, नताली स्कीवर (कर्णधार), एमी जोन्स (यष्टिरक्षक), माईया बाऊचर, कॅथरीन ब्रंट, सोफी एकलस्टोन, फ्रेया केंप, इजी वॉन्ग, सारा ग्लेन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, T20 cricket