मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CWG 2022: तिहेरी उडीत घडला इतिहास, पाहा भारतीय अ‍ॅथलिट्सची विक्रमी कामगिरी

CWG 2022: तिहेरी उडीत घडला इतिहास, पाहा भारतीय अ‍ॅथलिट्सची विक्रमी कामगिरी

एलदोसी पॉल आणि अबूबकर

एलदोसी पॉल आणि अबूबकर

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात तिहेरी उडीत भारताला मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं. याआधी भारताकडून मोहिंदर सिंग गिल यांनी कांस्य आणि रौप्य तर रणजीत महेश्वरी आणि अपरिंदर सिंगनं कांस्यपदक पटकावलं होतं.

    बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड जोरात सुरु आहे. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं. इतकच नव्हे तर तिहेरी उडीत सुवर्णपदकासह रौप्यपदकही भारताच्या झोळीत पडलं आणि एक इतिहास घडला. पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताच्या एलदोस पॉलनं गोल्ड मेडल पटकावलं. तर याच इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावणाराही अ‍ॅथलीट भारताचाच होता. तिहेरी उडीत अब्दुल्ला अबूबबकरनं दुसऱ्या स्थान मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. पॉलची ऐतिहासिक उडी एलदोस पॉलनं पुरुषांच्या तिहेरी उडीत आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 17.03 इतकं विक्रमी अंतर कापलं आणि सुवर्णपदक पक्क केलं. महत्वाचं म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात तिहेरी उडीत भारताला मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं. याआधी भारताकडून मोहिंदर सिंग गिल यांनी 1970 साली कांस्य तर 1974 साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर रणजीत महेश्वरीनं 2010 ला तर अपरिंदर सिंगनं 2014 मध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. दरम्यान 25 वर्षांचा पॉल याच वर्षी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठीही पात्र ठरला होता. पण तिथं त्याला पदकापर्यंत पोहोचता आलं नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत मात्र त्यानं ही कसर भरुन काढताना भारताला ऐतिहासिक पदक मिळवून दिलं. रौप्यपदकही भारतालाच पॉलपाठोपाठ भारताच्या अब्दुल्ला अबूबकरनं तिहेरी उडीत रौप्यपदकाची कमाई केली. अबूबकरनं 17.02 इतकी उडी मारली. त्यामुळे तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. हेही वाचा - CWG 2022 : भारतीय शटलर्सची कमाल; सिंधू, लक्ष्य सेन फायनलमध्ये पोडियमवर दोघे भारतीय अ‍ॅथलीट तिहेरी उडीत पदक मिळवल्यानंतर जेव्हा हे दोघंही अ‍ॅथलीट पोडियमवर पोहोचले तो क्षण ऐतिहासिक होता. कारण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत  अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदकविजेते एकाच पोडियमवर असण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. कांस्यपदक थोडक्यात हुकलं दरम्यान तिहेरी उडीच्या याच इव्हेंटमध्ये तीनही पदकं भारताकडे येण्याची संधी थोडक्यात हुकली.  पॉलनं सुवर्ण तर अबूबकरनं कांस्यपदक पटकावलं. पण भारताचाच चित्रवेल प्रवीण मात्र चौथ्या स्थानावर राहिला. चित्रवेल प्रवीण आणि कांस्यविजेत्या स्पर्धकामध्ये केवळ काही सेंटिमीटर्सचा फरक राहिला होता. त्यामुळे एकाच पोडियमवर तीनही भारतीय पदकविजेत्यांना पाहण्याची संधीही थोडक्यात हुकली.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Athletics, Sport

    पुढील बातम्या