मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी आखतोय रणनीती

मुंबईत जन्मलेला ‘हा’ गोलंदाज न्यूझीलंडकडून खेळणार! विराटला बाद करण्यासाठी आखतोय रणनीती

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी किवींचा मास्टरप्लॅन. विराटला बाद करण्यासाठी उतरवणार हुकुमी एक्का.

  • Share this:

वेलिंग्टन, 17 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. याआधी न्यूझीलंडने भारताला एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप दिला होता. त्याचा बदला घेण्याची संधी भारताकडे आहे. 21 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना सुरू होईल. पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. यासाठी आज न्यूझीलंडने 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यात न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट दुखापतीतून सावरत पुनरागमन करण्यात सज्ज आहे.

मात्र, न्यूझीलंडच्या संघात आणखी एका खेळाडूला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या या खेळाडूचा जन्म मुंबईत झाला आहे. आता हाच गोलंदाज विराटला बाद करण्यासाठी रणनीती आखत आहे. या खेळाडूचे नाव आहे एजाज पटेल. एजाजनं याआधी आपल्या फिरकीच्या जोरावर पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडले होते.

वाचा-भारताच्या फलंदाजाचे कंबरडे मोडण्यासाठी किवी उतरवणार हुकुमी एक्का!

एजाजला मिळाली कसोटी संघात संधी

न्यूझीलंडनं भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेत एजाजला संधी दिली आहे. 31 वर्षीय एजाज तब्बल 6 महिन्यांनंतर न्यूझीलंडकडून पुनरागमन केले आहे. एजाजनं 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एजाजनं आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत, यात 22 विकेट त्याच्या नावावर आहेत. मुख्य म्हणजे एजाजचा जन्म मुंबईत झाला आहे. 8 वर्षांचा असताना एजाज आपल्या परिवारासोबत ऑकलंड येथे स्थायिक झाला.

वाचा-इशांत शर्माची टीम इंडियात एन्ट्री, युवा खेळाडूचं पदार्पण लांबणार?

पदार्पणातच केली होती विक्रमी कामगिरी

16 नोव्हेंबर 2018 रोजी एजाजने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात एजाजनं जबरदस्त कामगिरी केली होती. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इजाज पटेलने दुसर्‍या डावात विकेट घेऊन पाकिस्तानच्या तोंडातून विजय खेचून आणला होता. न्यूझीलंडने हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला. पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी 176 धावा करायच्या होत्या. 3 गडी राखून 130 धावांवर पाकिस्तानचा संघ असताना एजाजनं इमाम-उल-हक, सरफराज अहमद, बिलाल आसिफ, हसन अली आणि अझर अली यांना बाद केले. एजाजच्या आक्रमक गोलंदाजीमुळं न्यूझीलंडला या सामन्यात विजय मिळाला. या सामन्यात एजाज पटेलला सामनावीर ठरविण्यात आले.

वाचा-‘क्रिकेट खेळलास तर बोट कापून टाकेन’, भारताच्या स्टार गोलंदाजाला मिळाली होती धमकी

भारतासाठी एजाज ठरणार धोकादायक

एजाज पटेल या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. भारतीय संघ गेल्या काही मालिकेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत. इंग्लंडमधील मोईन अली आणि ऑस्ट्रेलियामधील नॅथन लियॉन यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. एजाज पटेलने 223 प्रथम श्रेणी विकेट घेतल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघात एकच डावखुरा फलंदाज असेल, त्यामुळं एजाज विराटसेनेसाठी जास्त धोकादायक ठरेल.

न्यूझीलंडचा कसोटी संघ-केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, एजाज पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग.

First published: February 17, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या