Home /News /sport /

विजयासाठी टीम इंडियाची अनोखी 'शक्कल' पंचांनी पकडली, विराटला मैदानातच दिली समज

विजयासाठी टीम इंडियाची अनोखी 'शक्कल' पंचांनी पकडली, विराटला मैदानातच दिली समज

भारताला दुसऱ्या सामन्यात 7 गडी राखून पराभूत करत न्यूझीलंडने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. या सामन्यावेळी विराटने न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी एक शक्कल लढवली होती.,

    ख्राइस्टचर्च, 02 मार्च : भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सात गडी राखून पराभूत व्हावं लागलं. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही गमावली. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघांचा डाव 124 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 103 धावांची भागिदारी केली. यावेळी भारतीय गोलंदाजांची दमछाक सुरू होती. विकेट मिळत नसल्यानं भारताचा कर्णधार विराट कोहलीनं वेगळीच शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचांच्या लक्षात येताच त्याला मैदानावर त्याचवेळी समज देण्यात आली. तिसऱ्या दिवशी कोहलीने लॅथम आणि ब्लंडल यांना फसवण्यासाठी प्रयत्न केला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील चौथ्या षटकात विराटने लॅथम आणि ब्लंडल यांच्यात गैरसमज पसरवण्यासाठी चलाखी केली. दोघेही एकेरी धाव घेत असताना कोहली दोन असं ओरडताना दिसला. पंच रिचर्ट केटलबोरो यांनी विराटचा आवाज ऐकला आणि त्याच्याशी चर्चा केली. पंच कोहलीला इशारा देताना दिसले. त्यावेळी कोहलीसुद्धा पंचांना समजावून सांगताना दिसला. फाइन लेगला खेळाडूंना सावध राहण्यासाठी सूचना देत असल्याचं पंचांना सांगण्याचा प्रयत्न विराटने केला. कारण तिथं दोन धावा जाण्याची शक्यता होती. पण पंचांनी ते ऐकू न घेता त्यानं दोन असं ओरडल्याबद्दल समज दिली. कोहलीनं दिलेलं स्पष्टीकरणाने पंचांचे समाधान झाले नाही. हे वाचा : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा व्हाइट वॉश, कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर शेवटी टॉम लॅथमला बाद करून मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं ब्लंडल आणि कर्णधार केन विल्यम्सन यांना बाद केलं. मात्र मोठं आव्हान नसल्यानं टीम इंडियाला दबाव कायम राखता आला नाही. पहिल्या कसोटीपेक्षा विराट कोहली दुसऱ्या सामन्यात आक्रमक दिसत होता. हे वाचा : 'तू टीम इंडियात खेळशील', रोहित शर्माने क्रिकेटपटूला केला मेसेज
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या