मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG Cricket: सचिन, लक्ष्मणलाही नाही जमलं ते हरमनची टीम इंडिया करणार? आज शेवटची संधी

CWG Cricket: सचिन, लक्ष्मणलाही नाही जमलं ते हरमनची टीम इंडिया करणार? आज शेवटची संधी

सचिन, लक्ष्मणलाही नाही जमलं ते हरमनची टीम इंडिया करणार? आज शेवटची संधी

सचिन, लक्ष्मणलाही नाही जमलं ते हरमनची टीम इंडिया करणार? आज शेवटची संधी

CWG2022 - १९९८ नंतर राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हरमनप्रीतची वुमन ब्रिगेड भारताला राष्ट्रकुलमध्य़े पदक मिळवून देणार का? याचीच उत्सुकता आहे. पण त्याआधी भारतीय संघाला बार्बाडोसचं आव्हान मोडीत काढावं लागेल.

पुढे वाचा ...

बर्मिंगहॅम, 03 ऑगस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी बार्बाडोसविरुद्धचा आजचा सामना महत्वाचा ठरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासाठी उपांत्य फेरीतलं स्थान पक्क करण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण या सामन्यातला विजेता थेट बाद फेरीत दाखल होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10.30 वा. सुरु होईल.

स्पर्धेच्या ‘अ’ गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारतानं गेल्या सामन्यात पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. पण सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याची संधी भारतीय महिलांनी घालवली. त्यामुळे गुणतालिकेत दोन गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 4 गुणांसह पहिल्या आणि बार्बाडोस 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्ताननं आपले दोन्ही सामने गमावल्यानं भारत आणि बार्बाडोस यांच्यातला विजेता संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

आम्ही पाकला हरवलं... बार्बाडोसलाही हरवू

सामन्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हरमननं संघाचा सुपर फॉर्म कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ‘आम्हाला तयारीसाठी दोन दिवस मिळाले, त्यामुळे एक टीम म्हणून आम्ही चांगली कामगिरी करण्य़ाचा प्रयत्न करु’ असं हरमननं म्हटलं होतं. ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही खूप चांगला खेळ केला. पण अखेरच्या क्षणी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. पण पाकिस्तानविरुद्ध आम्ही विजयाचा आनंद साजरा केला. त्यामुळे पाकनंतर आता बार्बाडोसलाही आम्हाला हरवायचं आहे’ असा विश्वास तिनं व्यक्त केला होता.

स्मृती-शफालीवर मदार

भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. शफालीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 48 धावांची दमदार खेळी साकारली होती. स्मृतीनंही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. तिच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला 8 विकेट्सनी धूळ चारली होती. त्यामुळे बार्बाडोसविरुद्ध या दोघांची कामगिरी महत्वाची ठरेल. याशिवाय मधल्या फळीतील जेमिमा रॉड्रिग्स, कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांच्याकडून फलंदाजीत मोठ्या अपेक्षा आहेत. रेणुका सिंग, मेघना सिंग, स्नेह राणा यांच्यावर प्रामुख्यानं भारतीय गोलंदाजीची मदार राहिल.

हेही वाचा - दोन महिन्यात दोनदा भारत-पाकिस्तान महामुकाबला... चाहत्यांनो लक्षात ठेवा या तारखा!

बार्बाडोसचं आव्हान मोठं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखणारा वेस्ट इंडिजचा संघ राष्ट्रकुल स्पर्धेत बार्बाडोसच्या झेंड्याखाली खेळताना दिसतोय. बार्बाडोसनंही या स्पर्धेत आतापर्यंत भारताप्रमाणेच पाकिस्तानवर विजय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार स्वीकारली आहे. डिएंड्रा डॉटीन, मॅथ्यूज, नाईट, अलियन अशी फलंदाजांची आक्रमक आणि तगडी फळी बार्बाडोसकडे आहे. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात त्य़ांना रोखणं हे भारतीय गोलंदाजांसमोरचं आव्हान असेल.

1998 च्या राष्ट्रकुलमध्ये भारत अपयशी

1998 साली राष्ट्रकुल खेळांमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पुरुषांच्या वन डे सामन्यात त्यावेळी अजय जाडेजाच्या नेतृत्वात भारतीय संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळेचाही समावेश होता. १९९८ नंतर राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हरमनप्रीतची वुमन ब्रिगेड भारताला राष्ट्रकुलमध्य़े पदक मिळवून देणार का? याचीच उत्सुकता आहे. पण त्याआधी भारतीय संघाला बार्बाडोसचं आव्हान मोडीत काढावं लागेल.

First published:

Tags: Cricket, T20 cricket