सिल्हेत-बांगलादेश, 7 ऑक्टोबर: आजवर महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये कायमच भारताचं पारडं जड राहिलं आहे. भारतानं आजवर झालेल्या 12 सामन्यांमध्ये तब्बल 10 वेळा बाजी मारली होती. तर पाकिस्तानला केवळ दोनच सामने जिंकता आले होते. त्यामुळे आशिया कपच्या रणांगणात जेव्हा या दोन टीम पुन्हा एकदा आमनेसामने आल्या तेव्हाही भारताचंच पारडं जड मानलं गेलं. पण हरमनप्रीत आणि कंपनीनं मात्र निराशा केली आणि पाकिस्ताननं आशिया कपमध्ये भारताचा 13 धावांनी पराभव केला. याच पाकिस्तानचा काल दुबळ्या थायलंडनं पराभव केला होता. त्यामुळे जे थायलंडला जमलं ते बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
A close contest but it is Pakistan who win the game.#TeamIndia will look to bounce back in their next encounter 👍🏻
— BCCI Women (@BCCIWomen) October 7, 2022
Scorecard ▶️ https://t.co/Q9KRCvhtzz…#INDvPAK | #AsiaCup2022 pic.twitter.com/VDchyPQ5bU
हरमनप्रीतची एक चूक महागात? आशिया कपच्या या महामुकाबल्यात पाकिस्ताननं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानची अवस्था 3 बाद 33 अशी झाली होती. त्यानंतर कॅप्टन बिस्मा मारुफ (32) आणि निदा दारनं (56) पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 6 बाद 137 धावांची मजल मारता आली. 138 धावांचं टार्गेट टीम इंडियासमोर सोपं वाटत असतानाच पाकिस्ताननं सुरुवातीपासूनच धक्के दिले. अनुभवी स्मृती मानधना, मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स लवकरच माघारी परतले. पण त्यानंतर हरमनप्रीत कौरनं घातकी निर्णय घेताना हेमलता आणि पूजा वस्त्रकार यांना वर पाठवण्याचा निर्णय घेतला. सामन्यात हाच टर्निंग पॉईंट ठरला. महत्वाच्या सामन्यात प्रयोग कशासाठी? पूजा वस्त्रकार, हेमलता आणि त्यानंतर दिप्ती शर्माला वरच्या क्रमांकावर बढती देऊन हरमप्रीत कौर स्वत: सातव्या नंबरवर बॅटिंगला उतरली. तर गेल्या काही सामन्यात डावाची सुरुवात करणाऱ्या रिचा घोषला हरमननं आठव्या क्रमांकावर उतरवलं. हरमनप्रीतनं घेतलेले हेच निर्णय टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. कारण हरमन मैदानात आली तेव्हा भारताला कमी चेंडू आणि जास्त धावा असं समीकरण होतं. त्यामुळे मोठे फटके खेळण्याच्या नादात हरमननं विकेट फेकली. आणि भारतीय संघ 124 धावात ऑल आऊट झाला. हेही वाचा - Pro Kabaddi League: आजपासून ‘ले पंगा…’, कधी आणि कसे पाहता येणार प्रो कबड्डी लीगचे सामने? सामना संपल्यानंतर हरमनची कबुली दरम्यान सामना संपल्यानंतर हरमननं आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर संध्या संघात काही बदल करण्यात येत असल्याचं सांगितलं. आणि त्यासाठीच इतर फलंदाजांना पुढे पाठवून ती मागे थांबली. 138 धावांचं टार्गेट सोपं होतं पण बॅटिंग लाईन अप गडबडल्यानं आणि जास्त डॉट बॉल्स खेळल्यानं शेवटी सामना भारताच्या हातातून निसटला असं हरमन म्हणाली.