मुंबई, 8 जानेवारी : उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे . नागपूर येथे पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ दाखल झाला असून सध्या खेळाडू मालिका जिंकण्याच्या उद्देशाने कसून सराव करीत आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे सध्या दुखापतग्रस्त असलेला खेळाडू रिषभ पंतवर भडकले आहेत. एवढेच नाही तर रागाच्या भरता 'मी रिषभच्या कानाखाली वाजवेन' असे वक्तव्य त्यांनी केले.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी एका मुलाखतीदरम्यान रिषभबद्दल हे वक्तव्य केले. ते बोलताना म्हणाले, 'रिषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली वाजवेन, कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब केले. आजच्या तरुणांना अशा प्रकारची जोखीम घेण्याची काय गरज आहे? तरुण पिढीच्या अशा चुकांमुळे मला संताप येतो'.
कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक
कपिल देव रिषभ विषयी बोलताना म्हणाले, 'रिषभ एक उत्कृष्ट विकेटकिपर असण्यासोबतच तो जबरदस्त फलंदाज देखील आहे. उद्या पासून सुरु होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सिरीजमध्ये त्याची अनुपस्थिती भारतीय संघाकरता मोठी हानी आहे. रिषभ कसोटी सामन्यांमध्ये जलद धावा करतो त्याचा खेळ हा कसोटी क्रिकेटसाठी पूरक आहे. तेव्हा या सिरीजमध्ये भारतीय संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. मी देवाकडे प्रार्थना करो की रिषभ पंत लवकर बरा होऊ दे!'
कपिल यांनी खेळाडूंना त्यांच्या गाडीसाठी ड्रायव्हर ठेवण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, "तुमच्याकडे खूप वेगवान कार आहे पण तुम्हाला तुमची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवणं सहज परवडू शकत, तेव्हा तुम्हाला गाडी एकट्याने चालवण्याची गरज नाही. मी समजू शकतो की एखाद्याला अशा गोष्टीचा छंद किंवा आवड असते तरुण वयात ते असणे स्वाभाविक आहे, परंतु तुमच्याकडून भारतीय संघाला काही अपेक्षा आहेत, संघाप्रती तुमची काही जबाबदारी आहे. तेव्हा अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री रिषभ पंत एकटाच गाडी चालवत दिल्ली येथून घरी जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात रिषभची गाडी जळून खाक झाली परंतु गाडीची काच तोडून बाहेर पडल्याने रिषभचे प्राण बचावले. परंतु या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. मागील एक महिन्यापासून त्याच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायावर लिगामेंट सर्जरी देखील करण्यात आली असून पुढील काही काळ पूर्णपणे तंदुरुस्त होई पर्यंत रिषभ क्रिकेटपासून दूर राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Nagpur, Rishabh pant, Team india, Test cricket