नवी दिल्ली, 19 जानेवारी : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने न्यूझीलंडमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत कमबॅक केलं आहे. दुखापतीतून सावरलेल्या पृथ्वी शॉने न्यूझीलंड इलेव्हन विरुद्ध वॉर्मअप सामन्यात रविवारी 100 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 150 धावा फटकावल्या. त्याच्या या फटकेबाजीने टीम इंडियात खेळाडूंची धाकधूक वाढली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच पृथ्वी शॉने न्यूझीलंडमध्ये केलेल्या या खेळीमुळे त्याची वर्णी संघात लागली तर नवल वाटायला नको. पृथ्वी शॉच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने 49.2 षटकात सर्वबाद 372 धावा केल्या. रणजी ट्रॉफीवेळी दुखापत झालेल्या पृथ्वी शॉला न्यूझीलंड दौऱ्यात खेळता येईल की नाही अशी शंका होती. पण नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीने तो खेळू शकतो असं म्हटलं. न्यूझीलंड दौऱ्यावर जाताच पृथ्वीने आपण तंदुरुस्त असल्याचं खेळातून दाखवून दिलं आहे. सलामीला फलंदाजीला उतरलेल्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी 11.1 षटकांत 89 धावांची भागिदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मंयक बाद झाल्यानंतर भारताचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. मात्र, यावेळी दुसऱ्या बाजुने पृथ्वी शॉने सावध फटकेबाजी करत डाव सावरला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत 100 चेंडूत दीडशतकी खेळी केली. तो 35 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर विजय शंकरने 41 चेंडूत 58 धावा केल्या तर कृणाल पांड्याने 32 धावा केल्या. केएल राहुलच्या कामगिरीमुळे दोघांचे संघातील स्थान अडचणीत? टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर होणार आहे. पृथ्वी शॉच्या या कामगिरीमुळे त्याची संघात निवड झाली तर सध्या असलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सध्या ऋषभ पंत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसऱ्या सामन्याला मुकला. त्याशिवाय रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या खेळण्याबाबतही शंका आहे. तिसऱ्या सामन्यात जे खेळाडू खेळतील त्यांना न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळू शकते. धोनीनं दिली होती संधी, आता विराट संपवणार ‘पुणेकर’ खेळाडूचे करिअर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







