कोलकाता, 18 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs West Indies 2nd T20) 8 रननी रोमांचक विजय झाला. या विजयासोबतच भारताने 3 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. याआधी झालेल्या वनडे सीरिजमध्येही टीम इंडियाचा 3-0 ने विजय झाला होता. दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने दिलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 178 रन करता आले. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) यांच्यात 100 रनची पार्टनरशीप झाली. खरंतर 18 ओव्हरपर्यंत पूरन आणि पॉवेल बॅटिंग करत असल्यामुळे मॅच वेस्ट इंडिज जिंकेल असं वाटत होतं, पण भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टाकलेल्या 19 व्या ओव्हरमुळे मॅचचं चित्रच बदलून गेलं. 18 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा स्कोअर 158/2 एवढा होता. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 29 रनची गरज होती. या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने फक्त 4 रन दिले, याशिवाय त्याने धोकादायक निकोलस पूरनची विकेट घेतली. भुवीच्या या ओव्हरमुळेच भारताचा विजय शक्य झाला. भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 29 रन देऊन 1 विकेट घेतली. भुवीशिवाय युझवेंद्र चहल आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेलने 36 बॉलमध्ये नाबाद 68 रन आणि निकोलस पूरनने 41 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली. या सामन्यात दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालं. रवी बिष्णोईने सुरुवातीलाच निकोलस पूरनचा तर भुवनेश्वर कुमारने रोव्हमन पॉवेलचा कॅच सोडला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी टी-20 आता रविवारी कोलकात्यामध्येच होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टी-20 सीरिजमध्येही वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







