Home /News /sport /

IND vs SA : पुजारा-रहाणेचं भवितव्य काय? विराटने दिलं थेट उत्तर

IND vs SA : पुजारा-रहाणेचं भवितव्य काय? विराटने दिलं थेट उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू या सीरिजमध्येही अपयशी ठरले. विराट कोहलीला (Virat Kohli) पुजारा आणि रहाणेच्या भवितव्याबाबत विचारण्यात आलं.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 14 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाला. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने सीरिजमध्ये आघाडी घेतली, पण उरलेल्या दोन्ही टेस्ट गमावण्याची नामुष्की भारतीय टीमवर ओढावली. या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण ठरलं टीमची बॅटिंग. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या 6 टेस्टपैकी फक्त एकदाच टीमला ( Team India) 300 रनचा टप्पा गाठता आला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू या सीरिजमध्येही अपयशी ठरले. इंग्लंड पाठोपाठ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही या दोन्ही खेळाडूंची कामगिरी खराब झाली, त्यामुळे आता त्यांच्या टीम इंडियातल्या स्थानावरच टांगती तलवार आहे. केपटाऊन टेस्टनंतर विराट कोहलीला (Virat Kohli) पुजारा आणि रहाणेच्या भवितव्याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्याने हे सगळं निवड समितीवर ढकललं. टीममध्ये कोण राहणार आणि कोण नाही, हे सांगणं निवड समितीचं काम आहे, माझं नाही, असं विराट म्हणाला. तिसरी टेस्ट मॅच गमावल्यानंतर विराट जेव्हा पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याच्यावर प्रश्न बरसू लागले. चूक कुठे झाली, कुणामुळे झाली, मॅचचा टर्निंग पॉईंट काय होता, पुजारा-रहाणेला आणखी किती संधी मिळणार, असे प्रश्न विराटला विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विराटने दिली. 'टीममध्ये कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही, याचं उत्तर मी देऊ शकत नाही. टीम निवडणं माझं काम नाही, हे निवड समितीचं काम आहे. पण मी पुजारा आणि रहाणेला यापुढेही पाठिंबा देत राहीन,' असं उत्तर विराटने दिलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या सेंच्युरियनच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 113 रननी विजय झाला होता. यामुळे दुसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयाचा दावेदार होता, पण दक्षिण आफ्रिकेने 241 रनचं आव्हान अगदी सहज पार केलं. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही 212 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट राखून पूर्ण केलं आणि सीरिज आपल्या नावावर केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या