मुंबई, 3 डिसेंबर 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियात तीन बदल करण्यात आले आहेत. कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) टीम इंडियात पुनरागमन झाल्यामुळे अजिंक्य रहाणेला बाहेर करण्यात आलं, तर इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाऐवजी जयंत यादवला संधी देण्यात आली. या तिन्ही खेळाडूंना दुखापत झाल्याचं बीसीसीआयने मॅचआधी सांगितलं. अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांच्यावर खराब फॉर्ममुळे आधीच टीका करण्यात येत होती, तसंच त्यांचं टीममधलं स्थानही धोक्यात आलं होतं. आता या दोघांना झालेल्या दुखापतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना अचानक दुखापत होऊन ते टीमबाहेर जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा खेळाडूच्या टीम निवडीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर दुखापतीमुळे खेळाडूला बाहेर केल्याचं सांगितलं गेलं.
विजय शंकर
2019 वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर (Vijay Shankar) याची टीम इंडियामध्ये निवड झाली होती, यानंतर तो वर्ल्ड कपच्या मॅचही खेळला. अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) वगळून विजय शंकरला वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत निवडण्यात आलं. तेव्हाही त्याच्या निवडीवर टीका करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकरची कामगिरी निराशाजनक झाली, यानंतर त्याला दुखापत झाल्यामुळे टीममधून बाहेर करण्यात आलं. वर्ल्ड कपच्या दोन वर्षांनंतरही विजय शंकरची टीममध्ये परत निवड झाली नाही.
शुभमन गिल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर शुभमन गिलला (Shubhaman Gill) इंग्लंडच्या भारत दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही संधी देण्यात आली, पण या सीरिजमध्ये तो अपयशी ठरला. तरीही इंग्लंडमध्ये जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) गिलला खेळवण्यात आलं, या सामन्यातही गिलला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडमधल्या स्विंग होणाऱ्या वातावरणात गिलच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तिकडेच टेस्ट सीरिज खेळणार होती, पण फायनलनंतर गिलला दुखापत झाली, ज्यामुळे तो भारतात परतला.
वरुण चक्रवर्ती
मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख मिळवलेल्या वरुण चक्रवर्तीची (Varun Chakravarthy) टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियात निवड झाली, पण या स्पर्धेत त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरुणला एकही विकेट न मिळाल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर करण्यात आलं, यावेळी विराटने चक्रवर्तीला दुखापत झाल्याचं सांगितलं.
इशांत शर्मा
सध्याचा भारताचा सगळ्यात यशस्वी फास्ट बॉलर असलेल्या इशांत शर्माची (Ishan Sharma) मागच्या काही काळातली कामगिरी खराब झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात मदत करणारं वातावरण असतानाही इशांत शर्माला त्याची चमक दाखवता आली नाही, यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर टेस्टमध्येही इशांत संघर्ष करताना दिसला. यानंतर आता इशांत शर्माच्या डाव्या हात्याच्या बोटाला दुखापत झाल्याचं सांगून त्याला मुंबई टेस्टमधून वगळण्यात आलं.
अजिंक्य रहाणे
कानपूर टेस्टमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं आहे. अजिंक्य रहाणेच्या पायाचे स्नायू दुखावले असल्याचं बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने शतक केलं, यानंतर त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये शतक करता आलं नाही. इंग्लंड दौऱ्यातही लॉर्ड्स टेस्टमध्ये केलेल्या अर्धशतकाशिवाय इतर सगळ्या इनिंगमध्ये रहाणे 20 रनच्या आत आऊट झाला. रहाणेचा हा खराब फॉर्म बघता त्याच्या टीममधल्या स्थानावरच टांगती तलवार होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Team india, Virat kohli