जयपूर, 18 नोव्हेंबर: जयपूरमध्ये बुधवारी खेळल्या गेलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या 21 वर्षीय रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) मैदानात उतरवले. त्याची सामन्यात मोलाची कामगिरी पाहायला मिळाली नसली तरी क्रिकेट जगतात सध्या त्याची हवा आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. वेलिंग्टनमध्ये जन्मलेला रचिनचे भारतीय कनेक्शन खूपच हटके आहे. भारताच्या दिग्गज खेळाडूंशी रचिनचे नावाचे अनोखे नाते आहे. रचिन रवींद्र याचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 रोजी झाला. रचिनचे वडिल रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. बऱ्याच वर्षांपासून ते न्यूझीलंडमध्येच आहेत. रचिनचा जन्मही न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. रवि कृष्णमूर्ती हे बंगळुरू येथील सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट होते. न्यूझीलंडमधील हट हॉक्स क्लबचे संस्थापक रवींद्र यांचे वडील रवी कृष्णमूर्ती 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून स्थलांतरित झाले आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.
रा-राहुल, चिन-सचिन- रचिन नावाचे अनोखे मिश्रण
कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. तेथेच रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याचा जन्म झाला. रचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर (Sachine Tendulkar) आणि राहुल द्रविडचे (Rahul Dravid) चाहते असलेल्या रचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव ‘रचिन’ ठेवले. न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचिन हा आगामी काळातील स्टार मानला जातो. 2016 आणि 2018 मध्ये न्यूझीलंडसाठी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतही रचिनने भाग घेतला आणि चमकदार कामगिरी केली. याशिवाय नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड संघात रचिन कायम आहे. रचिनने सप्टेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
2019-20 मध्ये प्रथम-श्रेणी शतक झळकावले
त्याच्या वय-स्तरीय क्रिकेटदरम्यान, रचिनला 2018-19 हंगामात वेलिंग्टनसोबत करार मिळाला, त्याच मोसमात त्याने पाकिस्तानविरुद्ध लिस्ट ए क्रिकेमध्ये पदार्पण केले. त्याने 2019-20 फोर्ड ट्रॉफीमध्ये वेलिंग्टनचे प्रतिनिधित्व करताना त्याचे पहिले लिस्ट ए शतक झळकावले. 2019-20 प्लंकेट शील्डमध्ये त्याने पहिले प्रथम-श्रेणी शतक झळकावले.
सप्टेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
नोव्हेंबर 2020 मध्ये, न्यूझीलंडच्या दौर्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या सराव सामन्यांसाठी किवी अ क्रिकेट संघात त्याची निवड करण्यात आली. जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तो न्यूझीलंडच्या संघाचाही भाग होता. त्याने सप्टेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये न्यूझीलंडचा अखेर 2-3 असा पराभव झाला.
भारताविरुद्ध फक्त 7 धावा केल्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात 18 व्या षटकात फलंदाजीसाठी आलेला रचिन 8 चेंडूंच्या डावात केवळ 7 धावा करू शकला. त्याला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड केले. रचिन रवींद्र हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. मात्र, भारताविरुद्धच्या या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.