मुंबई, 27 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजचा दुसरा सामना (India vs New Zealand 2nd Test) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. 3 डिसेंबरपासून या मॅचला सुरुवात होणार आहे, पण यासाठी स्टेडियममध्ये फक्त 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमची क्षमता 30,000 हजार प्रेक्षकांची आहे. प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितलं. आम्ही प्रेक्षकांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी मागू, असं एमसीएचा अधिकारी म्हणाला.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार वानखेडे टेस्टसाठी 25 टक्के प्रेक्षकांनाच सामना बघण्याची परवानगी देण्यात येईल. एमसीएला मात्र 50 टक्के प्रेक्षकांना तरी मॅच बघता येईल, अशी अपेक्षा आहे.
वानखेडे स्टेडियमवर अखेरची टेस्ट मॅच डिसेंबर 2016 साली झाली होती. या मॅचमुळे स्टेडियममध्ये टेस्ट क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षीही फार क्रिकेट खेळलं गेलं नाही. विराट कोहलीही याच सामन्यातून टीममध्ये पुनरागमन करेल. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराटला टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिजमधून आराम देण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे अनेक देश सतर्क झाले आहेत. देशातल्या इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या व्हेरियंटमुळे टीम इंडियाचा पुढच्या महिन्यात सुरू होणारा दक्षिण आफ्रिकेचा दौराही अडचणीत सापडला आहे. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.
दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आयसीसीने झिम्बाब्वेमधला महिला क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर 2021 (ICC Women's World Cup Qualifier) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Team india, Wankhede stadium