मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरूद्ध न्यूझीलंड(IND Vs NZ, 2nd Test) मुंबई कसोटी सामन्याला गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उशिराने सुरूवात होणार आहे. पण मुंबईतील हा सामना थोडासा खास असणार आहे तो म्हणजे महिला स्कोअररच्या निमित्ताने. पहिल्यांदाच दोन महिला स्कोअररची नियुक्ती करण्यात(Mumbai Women Cricket Scorer) आली आहे. मराठमोळ्या क्षमा साने (Kshma Sane)आणि सुषमा सावंत (Sushma Sawant)या दोन महिलांकडून ही जबाबदारी पार पाडण्यात येईल. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्कोरिंगची जबाबदारी दोन महिलांकडे असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्षमा साने आणि सुषमा सावंत यांची या कसोटीवर बीसीसीआयकडून अधिकृत स्कोरर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे भारतात एखाद्या कसोटी सामन्यासाठी स्कोरिंगची जबाबदारी महिलांनी सांभाळण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. याआधी सौराष्ट्र येथे हेमाली देसाई आणि सेजल दवे या महिला स्कोअरर जोडीने कसोटी सामन्यासाठी स्कोअरिंग केले होते. जवळपास 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या दोन्ही मुंबईकर महिलांना वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात ही स्कोअररची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. 45 वर्षीय क्षमा या मुंबईतील नाहूरच्या रहिवासी आहेत. त्या 2010 साली बीसीसीआय स्कोअररची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 50 वर्षीय सुषमा या क्षमा यांना साथ देतील. सुषमा या चेंबूरच्या रहिवासी असून, त्यांनी 2010 साली बीसीसीआयची स्कोअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली. क्षमा साने या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एक आघाडीच्या स्कोरर आहेत. पण त्यांचं मुंबई क्रिकेटमधलं योगदान हे केवळ स्कोरर म्हणून नाही. त्यांनी 1990 साली मुंबईकडून अंडर-15 क्रिकेटही खेळलंय. त्यानंतर 1996 साली त्यांनी पंच परीक्षाही दिली. या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या, पण पुढे यामध्ये कारकीर्द करण्याचं त्यांनी टाळलं. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजेच 2006 साली क्षमा साने यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कोररची परीक्षा दिली. आणि 2010 साली त्या बीसीसीआयची स्कोरर परीक्षा उत्तीर्ण झाल्या. क्षमा यांच्यासोबत स्कोरर म्हणून काम पाहणाऱ्या सुषमा सावंत यादेखील बीसीसीआयच्या 2010 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्कोरर. त्या पेशानं अकाऊंटंट आहेत. सुषमा सावंत यांनीही गेल्या 10 वर्षात बीसीसीआयच्या अनेक स्पर्धा, आयपीएल, ज्युनियर क्रिकेट, एमसीएच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि इतर सान्यात स्कोरिंग केलंय. 2013 सालच्या महिला विश्वचषकात हा त्यांच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड. न्यूझीलंडच्या टीमला आजवर भारतात कधीही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 1988 साली त्यांनी भारतामध्ये अखेरची टेस्ट मॅच जिंकली होती. त्यानंतर दोन्ही टीमनी 18 टेस्ट खेळल्या, ज्यातल्या 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 9 मॅच ड्रॉ झाल्या. न्यूझीलंडला भारतात 34 पैकी फक्त 2 टेस्ट जिंकता आल्या आहेत. न्यूझीलंडने भारतात पहिली टेस्ट 1955 साली खेळली होती, म्हणजेच 66 वर्षांमध्ये त्यांना भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.