कानपूर, 28 नोव्हेंबर : श्रेयस अय्यर आणि ऋद्धीमान साहा यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs New Zealand 1st Test) संकटातून बाहेर पडली आहे. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं, तर ऋद्धीमान साहादेखील (Wriddhiman Saha) अर्धशतक करून नाबाद राहिला. 234/7 वर भारताने इनिंग घोषित केली, त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 284 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीलाच विल यंगच्या रुपात पहिला धक्का बसला. अश्विनने त्याला एलबीडब्ल्यू केलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर 4/1 एवढा आहे. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 280 रनची गरज आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात 14/1 अशी करणाऱ्या टीम इंडियाची अवस्था खराब झाली होती. 51 रनवरच टीमच्या 5 विकेट गेल्या होत्या, पण श्रेयस अय्यर, अश्विन, साहा आणि अक्षर पटेल यांनी टीमला वाचवलं.
श्रेयस अय्यर 65 रन करून, तर अश्विन 32 रनवर आऊट झाला. ऋद्धीमान साहा 61 रनवर आणि अक्षर पटेल (Axar Patel) 28 रनवर नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदी (Tim Southee) आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या आणि एजाझ पटेलला एक विकेट घेण्यात यश आलं.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. चौथ्या दिवशी सकाळी कायले जेमीसननं पुजाराला सर्वप्रथम आऊट केले. चेतेश्वर पुजारा आऊट झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) तर फक्त 4 रन काढून आऊट झाला.
चेतेश्वर पुजारा नंबर 3, विराट कोहली नंबर 4 आणि अजिंक्य रहाणे नंबर 5 अशी टीम इंडियाची टेस्टमधील बॅटींग ऑर्डर बऱ्याच वर्षांपासून आहे. कानपूर टेस्टमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळाली. श्रेयसनं पहिल्या इनिंगमध्ये 105 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करत ही निवड सार्थ ठरवली. आता मुंबई टेस्टमध्ये विराट टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे विराटसाठी अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा या दोन दिग्गजांपैकी एकाला टीम मॅनेजमेंटला वगळावे लागेल.
पहिल्या इनिंगमध्ये 345 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 296 रनवर रोखलं, त्यामुळे भारताला 49 रनची आघाडी मिळाली. अक्षर पटेलने न्यूझीलंडच्या 5 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Shreyas iyer, Team india