हैदराबाद, 18 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 12 रननी विजय झाला. भारताच्या 350 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना न्यूझीलंड 337 रनवर ऑलआऊट झाली. किवी टीमने पहिल्या 6 विकेट 131 रनवरच गमावल्या, पण मिचेल ब्रेसवेल याने मिचेल सॅन्टनरला सोबत घेऊन वादळी खेळी केली. ब्रेसवेलने 78 बॉलमध्ये 140 आणि सॅन्टनरने 45 बॉलमध्ये 57 रन केले. भारताचा ओपनर शुभमन गिल याने द्विशतक केलं. गिलने 149 बॉलमध्ये 208 रनची खेळी केली, ज्यात 19 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. शुभमन गिलच्या या खेळीचं क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे, पण इशान किशनने या सामन्यात केलेल्या एका कृत्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. इशान किशनने विकेट कीपिंग करत असताना बॅटर क्रीजमध्ये असतानाही स्टम्पवर असलेल्या बेल्स उडवल्या. कुलदीप यादव टाकत असलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ओव्हरच्या चौथ्या बॉलला किवी कर्णधार टॉम लेथमने बॉल सुरक्षित खेळला. रिप्लेमध्ये खेळाडूचं शरीर आणि स्टम्प्स यांच्यात कोणताही संपर्क झालेला नाही, हे दिसत होतं. तसंच लेथम क्रीजमध्येही होता, पण मैदानातल्या अंपायरने थर्ड अंपायरकडे जायचा निर्णय घेतला. थर्ड अंपायरकडे निर्णय गेल्यानंतर मैदानतल्या मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला आणि इशान किशन खोट्यात पडला. यानंतरही इशान किशनच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं.
इशान किशनचं हे कृत्य भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि मुरली कार्तिक यांना आवडलं नाही. इशान किशनने जे केलं ते क्रिकेट नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गावसकर यांनी कॉमेंट्री करताना दिली. इशान किशनने मनोरंजनासाठी अपील करायला नको होतं, असं मुरली कार्तिक म्हणाला. टॉम लेथमनेही भारताची बॅटिंग सुरू असताना असंच केलं होतं आणि थर्ड अंपायरने हार्दिक पांड्याला आऊटही दिलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या द्विशतकामुळे भारताला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 349 रन केले. गिलने 149 बॉलमध्ये 208 रनची खेळी केली. लॉकी फर्ग्युसनच्या बॉलिंगवर गिलने लागोपाठ तीन सिक्स मारत द्विशतक पूर्ण केलं. गिलशिवाय रोहित शर्माने 34 आणि सूर्यकुमार यादवने 31 रन केले. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरेल मिचेलला 2-2 विकेट मिळाल्या.