ढाका, 10 डिसेंबर: भारतीय वन-डे क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन मॅचेसची वन-डे सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधली तिसरी आणि शेवटची मॅच आज खेळवली जाणार आहे. या मॅचपूर्वी टीम इंडियातले तीन महत्त्वाचे खेळाडू जखमी असल्यामुळे टीममध्ये बदल दिसतील. बांगलादेशविरुद्धच्या या वन-डे सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्मासह दीपक चहर आणि कुलदीप सेन जखमी झाले आहेत. त्यामुळे एका वन-डे मॅचसाठी कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. क्लीन स्वीपचा धोका टाळण्यासाठी टीम मॅनेजमेंट आजच्या (10 डिसेंबर) मॅचमध्ये कोणती प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ढाक्यातल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये बांगलादेशची बॅटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न करताना कॅप्टन रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्यातून रक्तस्राव होताना दिसला. काही काळ विश्रांती घेऊन नवव्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी मैदानात आला होता. त्यानं नॉट आउट 51 रन्सची खेळीही केली; पण यादरम्यान त्याला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला. मॅच संपल्यानंतर तो पुढच्या उपचारांसाठी मुंबईला रवाना झाला. याच मॅचमध्ये बॉलर दीपक चहरलाही दुखापत झाली. पहिल्या वन-डेनंतर कुलदीप सेनही पाठीच्या दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला आहे.
या दोघांपैकी राहुल त्रिपाठी ओपनिंगही करू शकतो. त्यामुळे त्याला ओपनिंगला पाठवण्याचाही प्रयोग होऊ शकतो. दीपक चहर आणि कुलदीप सेन यांच्या अनुपस्थितीत कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यावीच लागेल.
दरम्यान, बांगलादेशने सुरुवातीच्या दोन्ही वन-डे मॅच जिंकून सीरिजवर कब्जा केला आहे. भारताला क्लीन स्वीपचा धोका जाणवत आहे. धोका टाळण्यासाठी टीम इंडियाला जोरदार प्रयत्न करावे लागतील.
तिसऱ्या वन-डेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन टीम : केएल राहुल (कॅप्टन), राहुल त्रिपाठी/ रजत पाटीदार, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Team india