ढाका, 24 डिसेंबर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी 8 व्या गड्यासाठी केलेल्या 71 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. बांगलादेशला 3 गडी राखून पराभूत करत मालिका 2-0 अशी जिंकली. अश्विनने 42 तर अय्यरने नाबाद 29 धावांची खेळी केली. बांगलादेशने भारताला 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताची अवस्था एकवेळ 7 बाद 74 अशी झाली होती. तेव्हा अश्विन आणि अय्यरने भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मीरपूरमधील शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतासमोर 145 धावांचे आव्हान होते. चौथ्या दिवशी भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. भारताची अवस्था 7 बाद 74 अशी झाली असताना आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी 71 धावांची अभेद्य भागिदारी केली. हेही वाचा : IND vs BAN : 30व्या वर्षीच संपणार स्टार खेळाडूचं टेस्ट करियर? बांगलादेशविरुद्धची सीरिज अखेरची! बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या होत्या. यात माजी कर्णधार मोमिनुलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली होती. यानतंर प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने पहिल्या डावात ऋषभ पंतच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर 314 धावा केल्या. यासह पहिल्या डावात भारताला 87 धावांची आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या डावात बांगलादेशने लिटन दासच्या 73 धावा आणि सलामीवीर जाकिर हसनच्या 51 धावांच्या जोरावर 231 धावा करून भारताला 145 धावांचे आव्हान दिले. तिसऱ्या दिवशी भारताचे आघाडीचे चारही फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारतावर पराभवाचे सावट होते. मात्र चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी संकटमोचक बनत भारताला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.