मुंबई, 25 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. बांगलादेशला त्यांच्याच देशात 2 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने धूळ चारली. यामध्ये दुसरा कसोटी सामना रंगतदार असा झाला. भारताला 145 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर संघाची अवस्था 7 बाद 74 अशी झाली होती. यानंतर आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी अभेद्य भागिदारी करत संघाला विजयी केलं. या विजयानंतर केएल राहुलने म्हटलं की, 7 गडी बाद झाल्यानतंरही भारताच्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास होता. मीरपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा डाव 4 बाद 45 वरून सुरू झाला. पण पुढचे 3 गडी लवकर बाद झाल्यानं भारताची अवस्था 7 बाद 74 अशी झाली होती. श्रेयस अय्यरने नाबाद 29 आणि रविचंद्रन अश्विनने 42 धावा केल्या. दोघांनी नाबाद 71 धावांची भागिदारी करत 145 धावांचं आव्हान पूर्ण केलं. हेही वाचा : अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत केला विक्रम, 34 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं
केएल राहुलने सामन्यानंतर ड्रेसिंगरूममधल्या वातावरणाबद्दल सांगताना म्हटलं की, तुम्हाला खेळपट्टीवर असलेल्या आपल्या फलंदाजांवर विश्वास ठेवायचा असतो. आमचा त्यांच्यावर विश्वास होता पण नर्व्हससुद्धा होतो. शेवटी आम्हीही माणूसच आहे. पण आमचा आमच्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास होता. आज श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यांनी चांगली कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. आम्ही कधीच असा विचार केला नाही की हा विजय सोपा असेल. आम्हाला माहिती होतं की, धावा करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत.
नव्या चेंडूवर धावा करणं आणखी कठीण असतं. आम्ही अपेक्षेहून जास्त विकेट गमावल्या. आम्ही चुका केल्या पण यातून आम्ही धडा घेऊ आणि आशा आहे की भविष्यात अशा परिस्थितीत चांगली कामगिरी करू असंही केएल राहुल म्हणाला. हेही वाचा : दिग्गजांकडून आर अश्विनचे कौतुक, तर थरूर यांनी निवड समितीवर साधला निशाणा गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुकही केएल राहुलने केलं. त्याने म्हटलं की, मालिकेत विजयावरून समजतं की आम्ही आपल्या वेगवान गोलंदाजांना कसं तयार केलं आहे. अश्विन आणि अक्षर पटेल यांनीही चांगली कामगिरी केली. तर उमेश यादवने त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. जयदेव उनादकटने दीर्घ कालावधीनंतर पुनरामगन करताना जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने जो दबाव टाकला त्याचा अश्विन आणि अक्षर पटेलने फायदा करून घेतल्याचंही केएल राहुलने म्हटलं.