मुंबई, 18 मार्च : शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना पारपडला. या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत प्रथमच हार्दिक पांड्याने वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी हार्दिकने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला वाईट वागणूक दिल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याने यापूर्वी काही टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी पारपाडत आहे, परंतु हार्दिकच्या मैदानावरील रागीट स्वभावामुळे तो अनेकदा टीकाकारांच्या निशाण्यावर येत असतो. असेच काहीसे कालच्या सामन्यात देखील झाले.
भारताची गोलंदाजी सुरु असताना 20 व्या षटकानंतर विराट कोहली हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासोबत उभा राहून काहीतरी बोलत होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटला हार्दिकला काही समजावून सांगायचे होते, पण तो त्याचे न ऐकताच निघून गेला. विराट कोहली हे पाहून अस्वस्थ झाला आणि जणू काही तो म्हणतोय की तुला जे हवं ते कर. हार्दिक आपल्या नादात पुढे गेला आणि त्याने विराटकडे मागे वळूनही पाहिले नाही.
— CricAddaa (@cricadda) March 17, 2023
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हार्दिकने विराटला दिलेल्या वागणुकीवर विराटाचे फॅन्स संताप व्यक्त करत आहेत. तसेच हार्दिक पंड्याला कॅप्टनसीचा गर्व आला आहे असे ही बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya, India vs Australia, Virat Kohli