मुंबई, 17 मार्च : एकीकडे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. त्याचवेळी, सातासमुद्रापार न्यूझीलंडमध्ये श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या सामन्यादरम्यान भर मैदानात एक विचित्र प्रकार घडला ज्यात नशेच्या अवस्थेत स्टार फलंदाजांचा कॅच पकडण्यात आला. सध्या न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पहिल्या कसोटी सामन्याशी संबंधित असून यात प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती दारू पीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बिअरचा ग्लास आहे. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरेल मिशेल हा जबरदस्त फलंदाजी करून श्रीलंकेच्या खेळाडूंना घाम फोडत होता. त्याला बाद करणे कोणालाही शक्य होत नव्हते, अशातच मिशेलने जोरदार शॉट मारला आणि हा शॉट सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
याचवेळी सामना पाहण्यासाठी आलेला एक तरुण डॅरेल मिशेलचा कॅच पाहण्यासाठी लगेच उभा राहिला. नशेच्या धुंद अवस्थेत त्याने हातातील बिअरचा ग्लासही सांडू न देता बाउंड्री लाईनच्या बाहेरून दुसऱ्या हाताने अप्रतिम झेल पकडला. सध्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाहून सर्वचआश्चर्यचकित होत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचल्यामुळे आता श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका केवळ औपचारिकता आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.