मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'म्हणून मला टार्गेट केलं जातंय..' धावपटू पीटी उषा भावूक, म्हणाल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न

'म्हणून मला टार्गेट केलं जातंय..' धावपटू पीटी उषा भावूक, म्हणाल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न

पीटी उषा अकादमीवर बेकायदा अतिक्रमण

पीटी उषा अकादमीवर बेकायदा अतिक्रमण

मी राज्यसभा खासदार झाल्यापासून 'उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स'ला लक्ष्य केले जात आहे, माझ्यावर वैयक्तिक हल्ले होत आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती माजी धावपट्टू पीटी उषा यांनी दिली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Kerala, India

    कोझिकोड, 4 फेब्रुवारी : भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी केवळ खेळाडूंच्या अनेक पिढ्यांना प्रेरणाच दिली नाही, तर अनेक तरुण खेळाडूंची कारकीर्द घडवण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला आहे. पण आता पी. टी. उषा यांच्या संस्थेच्या जागेवर गुंडांनी बेकायदेशीर बांधकाम केलं आहे. याबाबत त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

    पी. टी. उषा यांनी शनिवारी (4 फेब्रुवारी 2023) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केरळमधील कोझिकोड येथील 'उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स'च्या जमिनीवर काही गुंडांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केलाय. या वेळी बोलताना त्या भावूक झाल्या.

    पी. टी. उषा म्हणाल्या, ‘हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणी विनापरवानगी विद्यार्थिनींच्या कॅम्पसमध्ये कसा प्रवेश करू शकतं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. त्या पुढे म्हणाल्या, ‘बेकायदा बांधकाम होत असल्याचं पानागड पंचायतीला माहिती आहे. तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसह इतर खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. मी राज्यसभा खासदार झाल्यापासून 'उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स'ला लक्ष्य केलं जात आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका केली जातेय. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.’

    वाचा - अख्खं नागपूर बोलतंय, शुभमन आतातरी बघं! पोस्टर गर्लवरून उमेश यादवच ट्विट

    दरम्यान, पी. टी. उषा यांना 6 जुलै 2022 रोजी राज्यसभेसाठी नामांकन देण्यात आलं होतं. केंद्रातील भाजप सरकारनं उषा यांच्या राज्यसभा नामांकनासाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे शिफारस केली होती. सध्या त्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मानही त्यांनाच मिळाला आहे.

    1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्समध्ये पी. टी. उषा या 400 मीटर अडथळा शर्यतीत चौथ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यांचे कांस्यपदक एका सेकंदाच्या 1/100 वा भाग इतक्या कमी वेळामुळे हुकलं होतं. या स्पर्धेचा अंतिम फेरीचा व्हिडिओ आजही भारतीय क्रीडाप्रेमींच्या अंगावर काटा आणतो. पी. टी. उषा यांची ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत आशियातील अव्वल महिला खेळाडूंमध्ये गणना होते. पी. टी. उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या आहेत. उषा यांना भारत सरकारनं अर्जुन पुरस्कार प्रदान केला. तर, त्यांना भारतातला चौथा सर्वांत मोठा नागरी सन्मान, पद्मश्रीनंसुद्धा गौरवण्यात आलं आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत; आता त्यांच्या संस्थेच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

    First published:

    Tags: Athletics, Kerala