मुंबई, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) शुक्रवारी टीम इंडियाची लढत स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध होणार आहे. आता या स्पर्धेतील प्रत्येक लढत टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असून त्यामध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवणे देखील आवश्यक आहे. दरम्यान या लढतीपूर्वी, हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) गंभीर वक्तव्य केले आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. टी20 वर्ल्ड कपने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर रोहितचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये रोहिते शतक, रन यासर्वांवर भाष्य करत भावनिक मेसेज शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी केलेली कामगिरी अधिक महत्त्वाची आहे. जर तुमचा संघ एक चषक जिंकत नसेल, तर तुम्ही केलेल्या धावा, शतकांना काहीच अर्थ नसतो. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी तुम्ही दिलेलं योगदान महत्त्वाचं असल्याचे त्याने म्हटले आहे.
तसेच, आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलशी बोलताना, भारताच्या उपकर्णधाराने त्याच्या कारकिर्दीत संघाला स्वत:च्या पुढे ठेवण्यामध्ये त्याचे कार्य नेहमीच कसे होते याबद्दल भाष्य केले आहे. 2016 पासून मला खूप मोठा अनुभव मिळाला आहे. 2016 च्या तुलनेत आता फलंदाज म्हणून मी अधिक परिपक्व झालो आहे. खेळ अधिक चांगला समजू लागला आहे. संघाला काय हवं ते समजू लागलं आहे. संघाला कोणत्या वेळी, कोणत्या परिस्थितीत काय हवं, याचा मी कायम विचार करतो. आता मी एखादा फटका खेळण्याआधी स्वत:ला विचारतो की यावेळी माझ्या संघाला याची गरज आहे का? स्वत:च्या वैयक्तिक धावांपेक्षा संघहिताला अधिक प्राधान्य द्यायला हवं,’ असे रोहितने यावेळी सांगितले आहे. ग्रुप 2 मधून पाकिस्ताननं चार विजयासह यापूर्वीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडची टीम 2 विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागेल. नामिबिया किंवा अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला तर टीम इंडियाचं काम सोपं होणार आहे. अर्थात टीम इंडियाला सर्वात प्रथम त्यांच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी करणे आवश्यक आहेत.त्यामुळे स्कॉटलंड विरुद्ध मोठ्यात मोठा विजय मिळवण्याचं भारतीय टीमसमोर आव्हान असेल.

)







