वेलिंग्टन, 24 फेब्रुवारी : जगातला पहिल्या क्रमांकाचा संघ असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडनं 10 विकेटनं दणका दिला. याचबरोबर टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचा हा पहिला पराभव आहे. तर, या शानदार विजयासह न्यूझीलंडनं 60 गुण मिळवले आहेत. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचे सलग सात सामने जिंकल्यानंतर न्यूझीलंडमध्ये भारताला पहिला पराभव पत्करावा लागला. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 165 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 191 धावा करता आल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्याने 183 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली होती. चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघासमोर भारताने अवघ्या 9 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे न्यूझीलंडने केवळ 10 चेंडूत पार केले. वाचा- Ind vs NZ: टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने 10 विकेटने जिंकला सामना न्यूझीलंडला 60 गुण मिळाले आयसीसी कसोटी स्पर्धेप्रमाणे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात यजमानांनी 10 गडी राखून विजय मिळवला. यासह टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 60 गुण मिळवले. या विजयाचा न्यूझीलंडला जबरदस्त फायदा झाला आहे. यासह न्यूझीलंडचा सघ 120 गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी, तो 60 गुणांसह श्रीलंकेच्या खाली सहाव्या क्रमांकावर होता. या विजयासह न्यूझीलंडने श्रीलंकेला पाचव्या स्थानावरून खाली खेचले आहे. वाचा- विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिका भारतीय संघ सध्या कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारताने एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामने जिंकून एकूण 360 गुणांची नोंद केली. दुसर्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्याने 10 सामने खेळून 7 सामने जिंकले आहेत. तिसरे स्थान इंग्लंडच्या संघाचे आहे, ज्यांनी 9 कसोटींमध्ये 5 विजय आहेत. ऑस्ट्रेलियाचे 296 गुण असून इंग्लंडचे 146 गुण आहेत. पाच कसोटी सामने खेळल्यानंतर दोन विजय मिळविणारा पाकिस्तान संघ चौथ्या क्रमांकावर आहे तर न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे 140 आणि न्यूझीलंडचे 120 गुण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.