CWG 2022: ‘रेफ्रिलाच द्या गोल्ड मेडल’… महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप
CWG 2022: ‘रेफ्रिलाच द्या गोल्ड मेडल’… महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप
रेफ्रींची चूक, भारताचा पराभव
CWG2022: हॉकीत पेनल्टी शूटआऊटसाठी प्रत्येक खेळाडूला आठ सेकंदाचा वेळ दिला जातो. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूनं जेव्हा पहिल्या पेनल्टी स्ट्रोकचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी स्टॉपवॉच सुरुच झालं नव्हतं. नेमकं हेच कारण देत रेफ्रींनी ऑस्ट्रेलियन खेळाडूला पेनल्टी स्ट्रोकची पुन्हा संधी दिली. आणि यावरुनच वाद पेटला
बर्मिंगहॅम, 06 ऑगस्ट: शुक्रवारी रात्री राष्ट्रकुल महिला हॉकीत सेमीफाय़नलच्या निर्णायक लढतीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला आणि पेनल्टी शूटआऊटवर गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला 3-0 अशी हार स्वीकारावी लागली. पण याचवेळी रेफ्रींच्या एका निर्णयामुळे भारतीय संघाचं मनोबल खचलं आणि त्यासोबतच सुवर्णपदकाचं स्वप्नही भंगलं. त्यामुळे आता भारताला कांस्यपदकासाठी खेळावं लागणार आहे.
रेफ्रींचा कोणता निर्णय ठरला वादग्रस्त?
सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघ पेनल्टी शूटआऊटसाठी मैदानात आले. ऑस्ट्रेलियाची रोझी मेलन स्ट्रोकसाठी सज्ज झाली. पण तिचा प्रयत्न भारताची गोलकीपर सविता पुनियानं हाणून पाडला. मात्र त्याचवेळी सामन्यात एक वेगळा ट्विस्ट आला. पेनल्टी शूटआऊटसाठी प्रत्येक खेळाडूला आठ सेकंदाचा वेळ दिला जातो. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूनं जेव्हा पहिल्या पेनल्टी स्ट्रोकचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी स्टॉपवॉच सुरुच झालं नव्हतं. नेमकं हेच कारण देत रेफ्रींनी ऑस्ट्रेलियन खेळाडूला पेनल्टी स्ट्रोकची पुन्हा संधी दिली. आणि रोझी मेलननं त्यावेळी मात्र गोल डागत ऑस्ट्रेलियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पेनल्टी शूटआऊटच्या सुरुवातीलच असं घडल्यानं भारतीय खेळाडू मात्र मानसिकदृष्ट्या तेव्हाच बॅकफूटवर गेले. आणि ऑस्ट्रेलियानं 3-0 अशा फरकानं पेनल्टी शूटआऊटवर सामना खिशात घातला.
हेही वाचा - CWG 2022: वुमन ब्रिगेड फायनल गाठणार? इंग्लंडविरुद्ध आज निर्णायक लढतसोशल मीडियात संतापाची लाट
रेफ्रींच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि आयोजकांच्या गलधान कारभारामुळे भारताला हा सामना गमवावा लागला अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली. काहींनी तर रेफ्रींनाच ‘गोल्ड मेडल’ द्या अशी खोचक टीकाही केली. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक शॉपमन यांनीही रेफ्रींच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. ‘ पराभवाचं हे कारण असू शकत नाही. पण रेफ्रींनी ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाला पुन्हा संधी दिली त्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंचं लक्ष विचलित झालं.’ सामन्यानंतर भारतीय संघाची गोलकीपर सविता पुनियाला तर अश्रू अनावर झाले होते.
एफआयएचनं काय म्हटलं?
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. ‘बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या सेमीफायनलमधी पेनल्टी शूटआऊट चुकून खूप लवकर सुरु करण्यात आला. (तेव्हा टाईमकीपर तयार नव्हता) यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या परिस्थितीत नियमानुसार पुन्हा पेनल्टी शूटआऊटची संधी देण्यात येते आणि काल नेमकं तेच झालं. पण एफआयएच या सगळ्या घटनेची चौकशी करणार आहे. जेणेकरुन भविष्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही.’
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.