हैदराबाद, 19 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. यात अखेर भारताने बाजी मारत सामना 12 धावांनी जिंकला. शुभमन गिलचं द्विशतक आणि मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात हार्दिक पांड्या बाद झाला त्यावरून आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका पांड्याला बसल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे पांड्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून नाराजीही व्यक्त केली आहे. द्विशतक करणाऱ्या शुभमन गिलसोबत पांड्याही फलंदाजी करत होता. पांड्या २८ धावांवर खेळत असताना ४० व्या षटकात चौथ्या चेंडूवर गोंधळ झाला. डॅरिल मिशेलने टाकलेला चेंडू पांड्या फटकावण्यासाठी गेला पण हुकला आणि थेट विकेटकिपर टॉम लाथमच्या हातात गेला.न्यूझीलंडच्या संघाने पांड्या बाद असल्याचं अपील केलं. तेव्हा मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे याचा निर्णय मागितला. हेही वाचा : ब्रेसवेलनं केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच फलंदाज रिप्लेमध्ये चेंडू हार्दिक पांड्याच्या बॅटला लागला आहे की नाही हे पाहण्यात आलं. पण चेंडू पांड्याच्या बॅटपासून बराच वरती असल्याचं दिसलं. तर याचवेळी लाथमच्या ग्लोव्हजला लागून स्टम्पवरील बेल्स पडल्या होत्या. रिप्लेमध्येही स्पष्ट दिसत होतं की चेंडू स्टम्पच्या वरून जात होता. मात्र तरीही तिसऱ्या पंचांना पांड्याला बाद दिलं.
भारताचे फलंदाजीचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी कमेंट्री करत असताना या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केलं. तसंच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पांड्याचा व्हिडीओ शेअर करत आउट की नॉटआऊट असा प्रश्नही विचारला आहे. हेही वाचा : शुभमनच्या द्विशतकावर भारी पडलं असतं मायकल ब्रेसवेलचं शतक, शार्दुल ठाकुरने वाचवलं
सोशल मीडियावर नॉटआऊट हार्दिक पांड्या असा ट्रेंडही सुरू झाला. हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी पंचावंर रागही काढला आहे. रिप्ले पाहूनही पंचांनी चुकीचा निर्णय कसा दिला असा प्रश्न विचारला.