नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजकारणाबरोबरच अरूण जेटली यांचे खेळासोबतही खुप जवळचे संबंध होते. जेटली 1999 ते 2013 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळं क्रिकेट आणि त्यांचा खुप जवळचा संबंध होता.
जेटली यांच्या अध्यक्षतेखाली विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी भारतीय संघात पदार्पण केले. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले.
गौतम गंभीरनं जेटली यांच्या उपस्थितीत भारतीय संघात प्रवेशही केला आणि राजकारणातही प्रवेश करताना जेटली उपस्थित होते. गौतम गंभीर जेटली यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. लोकसभा निवडणूकती गंभीरच्या प्रचारातही जेटली स्वत: उपस्थित होते.
दरम्यान जेटलींवर जेव्हा DDCA भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते, तेव्हा गंभीरनं त्यांचे समर्थन केले होते. दरम्यान, भारतीय राजकारणातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून अरुण जेटली सगळ्यांच्याच स्मरणात राहतील. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अरुण जेटलींनी अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 ते 2019 या काळात ते अर्थमंत्री होते. त्यांच्या निधनानं राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे.
असा होता जेटलींचा राजकीय प्रवास
जेटली अर्थमंत्री असतानाच मोदी सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अमलबजावणीची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये GST चं विधेयकही मांडण्यात आलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातला एक दिग्गज अनुभवी चेहरा अशी त्यांची ओळख होती. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर अरुण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रिपदासोबतच काही काळ संरक्षण मंत्रिपदाचीही जबाबदारी होती. नंतर मनोहर पर्रिकर यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली.
वाचा-VIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा 1952 ते 2019 जीवनप्रवास
वाजपेयी सरकारमध्येही मंत्री
अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं. वाजपेयी सरकारच्याच काळात ते निर्गुंतवणूक मंत्रीही होते. राजकीय नेते आणि निष्णात वकील असलेल्या अरुण जेटलींनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वरिष्ठ वकील म्हणून काम केलं. अरुण जेटलींना चार्टर्ड अकांउंटंट व्हायचं होतं पण ते स्वप्न ते पूर्ण करू शकले नाहीत. दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून काम केलं. जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.1977 मध्ये अरुण जेटलींची दिल्ली अभाविपच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते भाजपच्या युवागटाचे अध्यक्षही होते.
वाचा-जेटलींनी आजारी असताना कलम 370 च्या ऐतिहासिक निर्णयावर लिहला होता शेवटचा ब्लॉग
बोफोर्स घोटाळ्याची चौकशी
माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये अरुण जेटलींनी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिलं. त्यावेळी त्यांनी बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीची कागपदत्रं तयार केली होती. अरुण जेटलींनी लालकृष्ण अडवाणी, माधवराव सिंदिया, शरद यादव या नेत्यांसाठी वकील म्हणून काम केलं आहे. कायदा आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखनही केलं आहे. त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही वकील म्हणून काम पाहिलं. कोका कोला आणि पेप्सीच्या खटल्यात त्यांनी पेप्सी कंपनीची बाजू लढवली होती. 2009 मध्ये राज्यसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर अरुण जेटलींनी वकिली सोडली आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अरुण जेटली अनेक वर्षं दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते.
वाचा-LIVE UPDATE:मोदी सरकारचे संकटमोचक अरुण जेटली कालवश, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्विराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.