मुंबई, 25 मार्च : कतारमध्ये यावर्षी सुरू होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) स्पर्धेचे पात्रता सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. युरोपीयन चॅम्पियन इटलीला (Italy Football Team) पात्रता फेरीत मोठा धक्का बसला आहे. इटलीचं आव्हान पात्रता फेरीतचं संपुष्टात आले. त्यामुळे कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये इटलीची टीम दिसणार नाही. नॉर्थ मॅसेडोनिया विरूद्धच्या महत्त्वाच्या लढतीमध्ये इटलीचा 0-1 असा पराभव झाला. या पराभवामुळे इटलीचं आव्हान संपुष्टात आले.
इटलीला सलग दुसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र होण्यामध्ये अपयश आलं आहे. मागील वर्ल्ड कपपूर्वी स्वीडन विरूद्ध त्यांचा 'प्ले ऑफ' मध्ये पराभव झाला होता. इटलीनं 1958 ते 2014 या काळात सलग फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे आता दुसऱ्यांदा कप स्पर्धेसाठी पात्र न होण्याची मोठी नामुश्की टीमवर ओढावली आहे. विशेष म्हणजे इटलीच्या टीमनं काही महिन्यापूर्वीच युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते.
इटलीचा पात्रता फेरीतील खेळ निराशाजनक झाला होता. त्यांना पाच मॅचमध्ये बरोबरी सहन करावी लागली. त्यामुळे त्यांची सरासरी खराब झाली. इटलीचा कॅप्टन गिओरगियो चेलीनीनं टीमची कामगिरी खराब झाल्याचं मान्य केलं. 'आम्ही सप्टेंबर महिन्यात चुका केल्या होत्या. त्याचा आम्हाला फटका बसला. या पराभवानं आम्ही व्यथित झालो आहोत,' असे त्याने सांगितले.
IPL 2022 : श्रेयसच्या टीममध्ये मिळणार मुंबईच्या दिग्गजाला संधी, पाहा KKR ची संभाव्य Playing11
जपानचा प्रवेश
दुसरिकडं जपाननं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करत वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. सलग सातव्यांदा जपानची टीम वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. जपान आणि सौदी अरेबिया या टीम आशिया खंडातील गटामधून पात्र झाल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाची टीम त्यांच्या गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत पात्र होण्यासाठी उर्वरित 2 मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.