मुंबई, 2 सप्टेंबर : दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनला आहे. वर्ल्ड कप पात्रता फेरीत आयर्लंड विरुद्ध 2 गोल करत त्यानं हा रेकॉर्ड केला. रोनाल्डोच्या पोर्तुगालनं ही मॅच 2-1 नं जिंकली. त्याचे आता 111 गोल झाले असून त्यानं इरानच्या अली देईला मागं टाकलंय. अलीच्या नावावर 109 गोल आहेत. अन्य कोणत्याही फुटबॉलपटूला आजवर 100 आंतरराष्ट्रीय गोल करता आलेले नाहीत. 36 वर्षांच्या रोनाल्डोनं यूरो 2020 (Euro 2020) स्पर्धेच्या दरम्यान अली देईच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. रोनाल्डनोनं मंगळवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये दोन्ही गोल हेडरनं केले. 88 मिनिटांपर्यंत मागे असलेल्या पोर्तुगालला त्यानं अगदी अखेरच्या टप्प्यात रोमहर्षक विजय मिळवून दिला. आयर्लंडच्या जॉन इगलनं 45 व्या मिनिटाला पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली होती. आयर्लंड या गोलच्या जोरावर मॅच जिंकणार असंच 88 मिनिटापर्यंत चित्र होतं. मात्र रोनाल्डोनं 89 व्या मिनिटाला पहिला गोल करत पोर्तुगालला बरोबरी करुन दिली. त्यानंत इंज्यूरी टाईममध्ये दुसरा गोल करत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोनाल्डोनं 111 आंतरराष्ट्रीय गोलपैकी सर्वाधिक 33 गोल हे वर्ल्ड कप पात्रता फेरीत केले आहेत. युरोपीयन चॅम्पियशिपमध्ये 31, मैत्रीपूर्ण मॅचमध्ये 19 तर वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं 5 गोल केले आहेत. रोनाल्डोनं 180 मॅचमध्ये 111 गोल केले आहेत. T20 World Cup 2021: टीम इंडियाची ‘या’ तारखेला होणार निवड! मेस्सी 8 व्या क्रमांकावर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाचा स्टार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांची नेहमी तुलना केली जाते. मेस्सीनं आजवर 151 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 76 गोल केले आहेत. तो अजूनही रोनाल्डोपेक्षा 35 गोलनं मागं असून सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत सध्या 8 व्या नंबरवर आहे. भारताचा सुनील छेत्री (Sunil Chhetri) 74 गोलसह 12 व्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोनं काही दिवसांपूर्वी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचस्टर युनायटेडशी पुन्हा एकदा करार केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.