मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Kho Kho League: खो खोची ‘अल्टिमेट’ लीग, पाहा मराठी मातीतल्या खेळाचं नवं रुप...

Kho Kho League: खो खोची ‘अल्टिमेट’ लीग, पाहा मराठी मातीतल्या खेळाचं नवं रुप...

अल्टिमेट खो खो लीग

अल्टिमेट खो खो लीग

Kho Kho League: प्रो कबड्डी लीग आणि कुस्ती लीगप्रमाणेच येतेय आता खो खोची ‘अल्टिमेट खो खो लीग’. रविवार 14 ऑगस्टपासून पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडा संकुलात खो खोच्या या नव्या कोऱ्या अध्यायाला सुरुवात होणार आहे.

बालेवाडी, पुणे – १३ ऑगस्ट: खो खो... महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, तिथूनच वर आलेला आणि लोकप्रिय झालेला एक पारंपरिक खेळ. गेली अनेक दशकं खो खो देशभरात खेळला जातोय. पण कुस्ती आणि कबड्डीप्रमाणे खो खो हा खेळही आता कात टाकणार आहे. कारण प्रो कबड्डी लीग आणि कुस्ती लीगप्रमाणेच येतेय आता खो खोची ‘अल्टिमेट खो खो लीग’. रविवार 14 ऑगस्टपासून पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडा संकुलात खो खोच्या या नव्या कोऱ्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मातीतल्या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरमुळे आता हा खेळ चक्क मॅटवर खेळला जाणार आहे.

अल्टिमेट खो खो लीगचं स्वरुप

अल्टिमेट खो खो लीगमध्ये सहा फ्रँचायझींनी आपापले संघ मैदानात उतरवले आहेत.

 • मुंबई खिलाडीज
 • चेन्नई क्विक गन्स
 • गुजरात जायंट्स
 • ओडिशा जगरनॉट्स,
 • राजस्थान वॉरियर्स
 • तेलुगू योद्धा

या सहा संघांमध्ये खो खोची ही अल्टिमेट स्पर्धा रंगणार आहे. 14 ऑगस्टला सुरु होणारी ही स्पर्धा 4 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

मातीतल्या खेळाला मिळणार ग्लॅमर

आतापर्यंत कबड्डी आणि कुस्ती या मराठमोळ्या खेळांच्या स्पर्धेचं आयपीएलच्या धर्तीवर लीग स्वरुपात आयोजन करण्यात आलं. प्रो कबड्डी लीगला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. प्रो कबड्डी लीगचे आतापर्यंत 8 सीझन पार पडले आहेत. आणि त्याची लोकप्रियताही वाढताना दिसतेय. पण कुस्तीच्या बाबतीत मात्र हा प्रयोग फसला.

याच पार्श्वभूमीवर खो खो या खेळाला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी अल्टिमेट खो खो लीगचं पर्व सुरु होतंय. आता त्याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

हेही वाचा - Ultimate Kho Kho : लॉन्ड्रीचालकाचा मुलगा बनला मुंबईचा आधार, खो-खो लीगमध्ये घेणार भरारी, VIDEO

 पारंपरिक नियमांना खो

अल्टिमेट खो खो लीगमध्ये खेळाच्या आजवर चालत आलेल्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य खो खो संघटना आणि माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खो खोमध्ये 9 मिनिटांचे चार डाव खेळले जातात. पण अल्टिमेट खो खो लीगमध्ये सात मिनिटांचा एक डाव करण्यात आला आहे. ज्यामुळे खो खो खेळाचा मूळ गाभाच बदलला जात असल्याची टीका होत आहे.

अल्टिमेट खो खो लीगचे नियम

 • प्रत्येक डाव 9 ऐवजी 7 मिनिटांचा. त्यामुळे सामन्याचा वेळ 36 मिनिटांवरुन 28 मिनिटांवर
 • प्रत्येक गडी बाद झाल्यानंतर खेळ काही सेकंद थांबेल
 • प्रत्येक संघात दोन स्पेशल खेळाडू (वजीर), ज्यांना कोणत्याही दिशेनं धावण्याची मुभा
 • सूर मारुन प्रतिस्पर्ध्याला बाद केल्यास बोनस गुण
 • रोटेशन पॉलिसीचा समावेश, त्यामुळे पहिल्या डावात बाद न झालेल्या खेळाडूंना दुसऱ्या डावात उशीरानं संरक्षण करण्याची संधी

खो खो खेळाचा इतिहास

खो खो या खेळाला नेमकी कधी सुरुवात झाली याबाबत कोणतीही नोंद नाही. पण या खेळाचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला आहे. 1914 साली पुण्यात खो खोचे नियम बनवण्यासाठी एक समिती स्थापन झाली होती. पुढे 1924 साली बडोदा जिमखान्यानं खो खोची एक नियमावली प्रसिद्ध केली. 1960 साली भारतात पहिल्यांदा खो खोची राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली होती.

खो खो लीगचं थेट प्रक्षेपण

अल्टिमेट खो खो लीगचं सोनी वाहिनीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यामुळे मातीतून मॅटवर आलेल्या या मराठमोळ्या खेळाला आता किती लोकप्रियता मिळते आणि खो खोची ही अल्टिमेट लीग किती यशस्वी ठरते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

First published:

Tags: Kho kho, Pro kabaddi league, Sports