नवी दिल्ली, 4 मार्च : दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्हा दहशतवादाशी संबंधित बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. इथं दहशतवादी हल्ले झाल्याच्या बातम्या सातत्याने कानावर पडत असतात. अशातच या जिल्ह्यातील एका तरुणीने क्रिकेट खेळून नावलौकिक मिळवला आहे. याच जिल्ह्यातील ब्रारीपोरा गावातील 34 वर्षीय खेळाडू जासिया अख्तर हिची वूमन्स प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सीझनसाठी दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये निवड झाली आहे. तिला 20 लाख रुपयांमध्ये टीममध्ये घेण्यात आलं आहे. लिलावात तिची निवड झाल्यानंतर तिच्या गावात जल्लोष झाला होता. अत्यंत खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेल्या जासियाचा जम्मू-काश्मीरमध्ये मुलींसाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. तिला WPL मध्ये चांगली कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. या बाबतचं वृत्त ‘नवभारत टाइम्स’नं दिलं आहे.
जासियाच्या क्रिकेट खेळण्याची सुरुवात
जासियाने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती सांगते की, सामाजिक बंधनांमुळे त्यांच्या परिसरात मुलींना घराबाहेर निघणंही अवघड आहे. मात्र, वडिलांनी तिला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला. मग ती तिच्या मावसभावासोबत खेळू लागली. ती म्हणाली, 'माझ्या भागात सहा-सात महिने बर्फ पडतो आणि दोन महिने पाऊस पडतो. त्यामुळे उरलेल्या दिवसांत आम्हाला क्रिकेट खेळायला मिळते. आम्ही कधी रस्त्यांवर, कधी खडकाळ भागात खेळायचो.' जासियाचे वडील सफरचंदाची शेती करतात आणि तिची आई गृहिणी आहे.
हेही वाचा - महिलांवर अंडरगारमेंटचे मॉडेलिंग करण्यास बंदी, आता पुरुष ब्रा-पँटी घालताना दिसतात, नेमकं काय आहे प्रकरण
हरमनप्रीतने केली होती मदत
जासियाची आयडॉल भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे. तसेच, तिला ऑस्ट्रेलियन कॅप्टन मेग लॅनिंगकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली आहे. जासिया म्हणाली, 'मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा क्रिकेट किटबद्दल कोणतीही माहिती नव्हती. 2012-13 मध्ये जेव्हा मी जम्मू-काश्मीरसाठी खेळत होते, तेव्हा हरमनप्रीतने मला बॅट भेट दिली होती. मी चार वर्षे त्या बॅटने क्रिकेट खेळले. त्यानंतर 2019 मध्ये, मी स्वतःचं क्रिकेट किट विकत घेतलं होतं'.
जासियाचा दहशतवाद्यांबरोबरचा अनुभव
जासियाने या वेळी तिचा दहशतवादासंबंधी एक अनुभव सांगितला. 2006-07 मध्ये एकदा दहशतवादी त्यांच्या घरात घुसले होते आणि क्रिकेट खेळाडू आहे म्हणून तिला मारहाण केली होती. त्यानंतर तिला काही काळ क्रिकेट सोडावं लागलं होतं. ती म्हणाली, 'त्या घटनेनंतर माझा क्रिकेट खेळण्याचा निश्चय अधिक कठोर झाला. तसंच माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले.'
दरम्यान, जासियाला आशा आहे की काश्मीरमधील अनेक मुली ज्यांचं तिच्यासारखं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न आहे, त्यांना डब्ल्यूपीएल प्रेरणा देईल. येत्या काळात काश्मीरमधील अनेक मुली क्रिकेटर म्हणून नावारुपास येतील, असंही तिला वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Jammu kashmir, Viral