अॅडलेड, 10 नोव्हेंबर: जोस बटलरच्या इंग्लिश संघानं टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात भारताच्या स्वप्नांना सुरुंग लावला. 15 वर्षांनी टी20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानं ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. तर इंग्लंडनं 2016 नंतर पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला तब्बल 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ऐन मोक्याच्या क्षणी रोहित शर्माला भारतीय गोलंदाजांनी दगा दिला. 169 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात टीम इंडियाचे गोलंदाज अपयशी ठरले. हीच बाब भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
To the MCG in style 🤩
— ICC (@ICC) November 10, 2022
England make it to their second Men's #T20WorldCup final in three editions 🙌 #INDvENG pic.twitter.com/llz20I6nRe
बटलर-हेल्सचा तडाखा टीम इंडियानं 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 168 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या होत्या. पण कॅप्टन जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्ससमोर हे आव्हान तोकडं ठरलं. या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. त्यांनी 170 धावांची अभेद्य भागीदारी साकारुन फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. बटलरनं नाबाद 80 तर हेल्सनं नाबाद 86 धावांची खेळी करुन इंग्लंडला 16व्या ओव्हरमध्येच फायनलचं तिकीट कन्फर्म करुन दिलं.
GET IN! 🦁🦁🦁
— England Cricket (@englandcricket) November 10, 2022
To the #T20WorldCup final...
WE'RE ON OUR WAY! 🙌 pic.twitter.com/z1sQ6EmioP
भारतीय गोलंदाजांनी केली निराशा अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीसह टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांना या सामन्यात जराही कमाल दाखवता आली नाही. सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप महत्वाच्या सामन्यात फेल ठरला. तर भुवनेश्वर कुमार आणि शमीलाही हेल्स आणि बटलरला रोखता आलं नाही. रोहित शर्माच्या या महत्वाच्या शिलेदारांनी निर्णायक सामन्यात निराशा केल्यानं भारतावर पराभवाची नामुष्की ओढवली. पाकिस्तान-इंग्लंड फायनल आता मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड संघात यंदाच्या वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवून फायनल गाठली होती. तर आज इंग्लंडनं भारताला हरवून विजेतेपदासाठी आपला हक्क सांगितला आहे. मेलबर्नमध्ये 13 नोव्हेंबरला उभय संघात आता फायनल रंगणार आहे.