लाहोर, 22 सप्टेंबर : इंग्लंड आणि न्यूझीलंडने रद्द केलेला दौरा आमच्यासाठी धडा आहे, याच्यापुढे आम्ही फक्त स्वत:चं हित बघू, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी दिली आहे. न्यूझीलंडने (New Zealand Cancels Pakistan Tour) पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी सुरक्षेचं कारण देत दौऱ्यातून माघार घेतली, यानंतर इंग्लंडनेही (England Cancels Pakistan Tour) त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं. यानंतर रमीझ राजा यांनी नाराजी व्यक्त केली.
'मी इंग्लंडने माघार घेतल्यामुळे खूप निराश आहे, पण याची अपेक्षा होती. कारण पश्चिमी गट दुर्दैवाने एकत्र झाला आहे आणि एकमेकांचं समर्थन करायला लागला आहे. सुरक्षा आणि धोक्याच्या नावाखाली तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकता. न्यूझीलंडने सुरक्षेचं कारण दिलं, पण याबाबतची कोणतीही माहिती न देता त्यांनी पळ काढला,' असं रमीझ राजा ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले आहेत.
'आता इंग्लंडकडून अपेक्षा होती, पण आमच्यासाठी हा धडा आहे. आम्ही त्यांच्या देशात दौऱ्यावर जातो, कारण त्यांनी आमच्या देशात खेळायला यावं. आमच्या देशातलं क्रिकेट थांबणार नाही. क्रिकेट संघटनांनी एकमेकांची काळजी घेतली नाही, तर याला काहीच अर्थ नाही. आता आमच्याकडे वेस्ट इंडिजचीही सीरिज आहे, जी हिट ठरू शकते. ऑस्ट्रेलिया आधीपासूनच पुनर्विचार करत आहे. आम्ही कोणाकडे तक्रार करायची? ते आम्हाला आपले वाटले, पण त्यांनी आम्हाला आपलं मानलं नाही,' असं वक्तव्य रमीझ राजा यांनी केलं.
T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएब अख्तरची या टीमला 'धमकी'
'आम्हाला आमच्या क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारावी लागेल, तेव्हाच हे देश आमच्याविरुद्ध खेळतील. हे आमच्याही हिताचं आहे कारण त्यामुळे आमच्या खेळाडूंनाही चांगलं वेतन मिळेल आणि आमचा जास्त सन्मान होईल. ते पीएसएल खेळण्यासाठी येतात, तेव्हा घाबरलेले किंवा थकलेले नसतात. पण जेव्हा देशाचा दौरा करण्यासाठी यायचं असतं तेव्हा त्यांची मानसिकता वेगळी असते,' असं रमीझ राजा म्हणाले.
'आम्ही वर्ल्ड कपला जातो तेव्हा आमचं लक्ष्य भारताला हरवणं असतं, पण आता आमच्या निशाण्यावर आणखी दोन टीम आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड. ताकदीने उभे राहा आणि एक मानसिकता तयार करा, आपण पराभूत होणार नाही, कारण तुम्ही आमच्यासोबत योग्य केलं नाहीत. आम्ही मैदानात याचा बदला घेऊ,' असा इशारा रमीझ राजा यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, India vs Pakistan, New zealand, T20 world cup