मुंबई, 10 डिसेंबर : पाकिस्तानचा नवोदित फिरकीपटू अबरार अहमदने पदार्पणाच्या सामन्यात कमाल केली आहे. शुक्रवारी 9 डिसेंबरला त्याने मुल्तानच्या मैदानात इतिहास घडवला. सुरुवातीच्या अवघ्या तीन तासात त्याने अशी कामगिरी केली जी पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 70 वर्षात झाली नाही. अबरार अहमदने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अबरारने पदार्पणातच पहिल्या डावात 7 गडी बाद केले. यातील 5 विकेट त्याने पहिल्या सत्रात घेतल्या. पदार्पणात पहिल्या सेशनमध्ये 5 गडी बाद करणारा तो पाकिस्तानचा पहिला गोलंदाज बनला आहे. हेही वाचा : पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी याआधी कसोटी पदार्पणात पहिल्या दिवशी पाकिस्तानसाठी 5 गडी बाद करण्याची कामगिरी वहाब रियाजने केली होती. त्याने 2010 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर ही कामगिरी केली होती. अबरारने पदार्पणात पाकिस्तानकडून सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. 1996 मध्ये रावळपिंडीत न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद जाहिदने 66 धावात 7 बळी घेतले होते. तर मोहम्मद नजीरने कराचीत 1969 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 99 धावात 7 गडी बाद केले होते. अबरारने 114 धावा देत इंग्लंडचे 7 गडी बाद केले. हेही वाचा : पीटी उषा यांनी घडवला इतिहास, IOAच्या अध्यक्षपदी निवड होणारी पहिली महिला पाकिस्तानचा फिरकीपटू अबरारने कसोटीच्या इतिहासात पदार्पणात लंच आधी पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. याआधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या अल्फ व्हॅलेंटाइनने 1950 मध्ये केली होती. अबरार अहमदच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी दोन सत्रात इंग्लंडचा डाव गुंडाळला. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडला. मात्र मुल्तानच्या मैदानात गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. इंग्लंडने 5.43 च्या धावगतीने धावा केल्या. तर त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या दिवशी 2 बाद 107 धावा केल्या. अद्याप पाकिस्तान 174 धावांनी पिछाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.