इस्लामाबाद, 26 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानच्या निवड समितीचा हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. पीसीबीने त्याला महत्त्वाची जबाबदारी दिल्यानतंर आता उलट सुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका बाजूला काही माजी क्रिकेटपटूंनी शाहिद आफ्रिदीचं कौतुक केलं तर काहींनी हा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी घोषणा केली होती की, आफ्रिदी, अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार यांच्यासोबत कराचीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी एक हंगामी निवड समितीची स्थापना करतील. नजम सेठी यांनी म्हटलं होतं की, न्यूझीलंड दौऱ्यासाठी एका हंगामी निवड समितीची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यात शाहिद आफ्रिदी मुख्य निवडकर्ता, अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार यांचा समावेश आहे. हारून रशीद संयोजक असणार आहेत. हेही वाचा : कुलदीपला ड्रॉप का केले? केएल राहुलने दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात यावरून वादही रंगला आहे. तर माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने शाहीद आफ्रिदीवर टीका करताना एक फोटो शेअर केला आहे. यात आफ्रिदी दाताने चेंडूशी छेडछाड करताना दिसतो. कनेरियाने शेअर केलेला फोटो हा 2010 मध्ये पर्थवर खेळलेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावेळचा आहे. अनेकदा चेंडू कुरतडताना टीव्ही कॅमेऱ्यात दिसला होता. टीव्ही पंचांनी मैदानावरील पंचांना याची माहिती दिल्यानंतर आफ्रिदीशी बोलून पंचांनी चेंडू बदलला होता.
शाहिद आफ्रिदीला तेव्हा 2 टी20 सामन्यात खेळण्यास बंदीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप त्याने मान्य केला होता. तसंच हे सर्व संघांसाठी सामान्य असल्याचंही त्याने म्हटलं होतं. मी हे करायला नको होतं पण झालं. मी माझ्या गोलंदाजांना मदत करण्यासाठी आणि एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. जगात असा कोणताही संघ नाही जो चेंडूशी छेडछाड कर नसेल. माझी पद्धत चुकीची होती. मी असं करायला नको होतं असं आफ्रिदी म्हणाला होता. हेही वाचा : आधी भडकला, नंतर दिलं गिफ्ट; विराटच्या वागण्याचं होतंय कौतुक निवड समितीचा हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही तासातच आफ्रिदीने वेगवान गोलंदाज मीर हमजा आणि शाहनवाज दहानी, फिरकीपटू साजिद खान यांचा संघात समावेश केला. पीसीबीने सांगितलं की, हा निर्णय़ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमशी चर्चा केल्यानंतर घेतला गेला. आफ्रिदीने म्हटलं की, अलिकडच्या काळातील कामगिरी लक्षात घेऊन आम्ही वेगवान गोलंदाज मीर हमजा आणि शाहनवाज दहानी, फिरकीपटू साजिद खानला संघात घेतलं आहे. मला विश्वास आहे तीन अतिरिक्त गोलंदाजांना संघात घेतल्यानं बाबर आझमला पहिल्या कसोटीसाठी सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्यासाठी जास्त पर्याय मिळतील.