चेन्नई, 8 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जोशीमठ येथे हिमकडा कोसळून झालेल्या भयंकर घटनेते मोठी हानी झाली आहे. हिमकडा कोसळून आलेल्या महापूरात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 125 मजूर अद्याप बेपत्ता आहेत. भीषण पूरात जीवित तसंच वित्त हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या घटनेनंतर भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने बचावकार्यात मदतीसाठी एका मॅचची फी देण्याची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऋषभ भारतीय टीमचा सदस्य आहे.
रविवारी सकाळी 10.45 च्या सुमारास उत्तराखंडमध्ये भीषण घटना घडली. या घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफकडून सतत मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 16 जणांना यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या बचावकार्यात मदत करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत पुढे सरसावला आहे. तसंच त्याने इतरांनाही यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. पंतने ट्वीट करत लिहिलं की, उत्तराखंडमध्ये झालेल्या घटनेने अतिशय दु:ख झालं. मदत आणि बचावकार्यासाठी मी मॅचची फी देऊ इच्छितो तसंच लोकांनाही मदतीसाठी आवहन करतो.
Deeply pained by the loss of life in Uttarakhand. Would like to donate my match fee for the rescue efforts and would urge more people to help out.
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंच गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना 50000 रुपयांची मदत देण्याचं सांगितलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rishabh pant, Sports, Uttarakhand, Uttarakhand floods