मुंबई, 22 जानेवारी : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करत, ऐतिहासिक विजय मिळवला. मैदानावर कमालीची कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेचं एक फिल्मी कनेक्शनही आहे. एका मुलाखतीत अजिंक्य रहाणेच्या वडिलांनीच त्याच्या नावाबाबत खुलासा केला होता.
अजिंक्य रहाणेच्या वडिलांना एका मुलाखतीत अजिंक्यचं नाव, अजिंक्य का ठेवलं याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी उत्तम अभिनय करणारा अभिनेता अजिंक्य देव यांच्या नावावरून, अजिंक्य हे नाव ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अंजिक्य रहाणेच्या वडिलांची ही मुलाखत वाचल्यानंतर अभिनेते अजिंक्य देव (Ajinkkya Deo) यांनी, या गोष्टींचा मला अतिशय अभिमान वाटला असल्याची प्रतिक्रिया दिली.
'अजिंक्य रहाणेच्या वडिलांनी दिलेल्या उत्तराने मी अवाक झालो होतो. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या भारताच्या कॅप्टनशी माझं इतकं गोड नातं आहे, इतकं गोड कनेक्शन आहे, हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. हा अजिंक्य कायमच अजिंक्य राहील' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी अजिंक्य रहाणेला शुभेच्छाही दिल्या.
अजिंक्य हे नाव माझ्या आजोबांच्या नावावरून दिलं असल्याचं, अजिंक्य देव यांनी सांगितलं. माझे आजोबा छत्रपती शाहू महाराजांचे वकील होते आणि त्यांनी कोणतीही केस हारली नव्हती. म्हणूनच माझ्या वडिलांनी माझं नाव अजिंक्य ठेवलं. जो कधीही हारत नाही तो म्हणजे अजिंक्य, असा नावाचा अर्थही त्यांनी सांगितला.
अजिंक्य देव, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा आहे. 'झोलझाल' या मराठी चित्रपटातून त्यांनी अनेक वर्षानी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane