मुंबई, 19 जून: टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final) Playing 11 ची घोषणा गुरुवारीच केली होती. शुक्रवारी पावसामुळे संपूर्ण खेळ पाण्यात गेला. टॉस देखील होऊ शकला नाही. साऊथम्पटनमधील हवामान पाहता टीम इंडियामध्ये एक बदल करावा अशी सूचना माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. साऊथम्पटनचं हवामान पाहता टीम इंडियामध्ये एक अतिरिक्त बॅट्समनचा समावेश करावा तसंच अश्विन किंवा जडेजा या दोघांपैकी एकालाच अंतिम 11 मध्ये खेळवावं असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. गावसकर यांनी ‘आज तक’ वर बोलताना हा सल्ला दिला आहे. टीम बदलण्याची अद्यापही संधी “टीम इंडियाच्या अंतिम 11 ची घोषणा झाली आहे. मात्र टॉसच्या वेळी दोन्ही कॅप्टन एकमेकांना पेपर देत नाहीत तोपर्यंत ही फायनल नसते. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत यामध्ये बदल करु शकता. मी कॅप्टन होतो त्यावेळी एक अतिरिक्त बॅट्समन की स्पिन बॉलर याबाबत मला नेहमी संभ्रम असे. त्यावेळी मी विरोधी टीमचे अंतिम 11 पाहून त्यामध्ये अचानक बदल करत असे.” असे गावसकर यांनी सांगितले. साऊथम्पटनचं हवामान पाहता टीम मॅनेजमेंट कदाचित 11 खेळाडूंवर पुन्हा विचार करेल. टीममध्ये एक अतिरिक्त बॅट्समन खेळण्याची गज आहे. येथील हवामान न्यूझीलंडला बरीच मदत करणारे आहे. त्या परिस्थितीत एक अतिरिक्त बॅट्समन खेळवला तर पंत 7 व्या नंबरवर बॅटींगला उतरेल. त्यामुळे बॅटींगची खोली वाढेल. हवामानाचा विचार करता एका स्पिनरला वगळले जाऊ शकते. WTC Final: न्यूझीलंडला पावसाचा फायदा, ‘या’ Playing 11 सह उतरणार मैदानात! न्यूझीलंड टीमची घोषणा नाही न्यूझीलंडनं अद्याप अंतिम 11 जणांची घोषणा केलेली नाही. टॉसच्या दरम्यान टीम जाहीर केले जाईल असे न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी जाहीर केले आहे. पिचवरील गवत पाहता न्यूझीलंड सर्व फास्ट बॉलर्ससह फायनलमध्ये उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







