साऊथम्पटन, 18 जून : न्यूझीलंडचा संकटमोचक समजला जाणारा बॅट्समन बीजे वॅटलिंग (BJ Watling) भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (WTC Final 2021) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. फायनल मॅच जिंकून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट गोड करण्याची त्याला आशा आहे. वॅटलिंगची ही 75 वी आणि शेवटची टेस्ट असेल. कंबर दुखावल्यामुळे त्याने इंग्लंड विरुद्ध मागच्या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या टेस्टमधून माघार घेतली होती. त्यानंतर या महत्त्वाच्या टेस्टमध्ये तो पुनरागमन करणार आहे. वॅटलिंगनं फायनलपूर्वी सांगितले की, “मी या मॅचची वाट पाहत आहे. मी यामध्ये सर्वोत्तम खेळ करेल. माझा प्रयत्न टीमला विजय मिळवून देणे आहे.” वॅटलिंगनं 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या प्रवासावर तो म्हणाला की, “इतक्या मोठ्या करियरमध्ये फिटनेसची कोणती गंभीर समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे मी नशिबवान आहे. क्रिकेटपटूला लहान दुखापती होतात. काही वेळा कंबर दुखीनं उचल खाल्ली. पण काळाप्रमाणे या दुखापतींवर मात कशी करायची हे मी शिकलो. न्यूझीलंडकडून खेळतानाचा संपूर्ण काळ माझ्यासाठी आनंदाचा होता. हा एक अविस्मरणीय प्रवास होता.” इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडनं नुकतीच कसोटी मालिका जिंकली. त्यावर वॅटलिंग म्हणाला की, “इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवणे आमच्यासाठी खास आहे. हा फॉर्म कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करु.” वॅटलिंगचं न्यूझीलंड क्रिकेटच्या यशामध्ये मोठं योगदान आहे. ब्रँडन मॅकलम निवृत्त झाल्यानंतर त्याचा न्यूझीलंडचा प्रमुख विकेटकिपर म्हणून उदय झाला. WTC Final: ‘हरलो तरी फरक पडत नाही…’ विराट कोहलीचं मोठं वक्तव्य! वॅटलिंगनं त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत टेस्ट क्रिकेटमध्ये 38.11 च्या सरासरीनं 3773 रन काढले. ज्यामध्ये 8 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. वॅटलिंगनं 5 टी 20 आणि 28 वन-डेमध्येही न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.