मुंबई, 23 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट टीमनं या महिन्याच्या सुरूवातीला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला. टीम इंडियानं विक्रमी पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या दरम्यान भारतीय खेळाडूंनी मोठे हालाखीचे दिवस काढले. या वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचे मॅनेजर लॉबजंग तेन्जिंग यांनी ‘पीटीआय’ शी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. ‘वेस्ट इंडिजची आयोजनाची तयारी नीट नव्हती. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले बायो-बबलही कमकुवत होते. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त लॉजिस्टिकची गरज होती. पण, वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कपसंदर्भातील लोकं अतिशय सुस्त होते. त्यामुळे आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागला. गयानामध्ये आम्ही बराच त्रास सहन केला. त्यावेळी मी माझे सहकारी कोव्हिड-19 मुळे संक्रमित झालो होतो. आमच्या मदतीसाठी तिथं कुणीही डॉक्टर किंवा कर्मचारी नव्हता. आम्हाला औषधही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यावेळी टीमच्या फिजियोनं आमची मदत केली.’ असा धक्कादायक खुलासा लॉबजंग यांनी केला आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमधील भारत विरूद्ध आयर्लंड मॅचपूर्वी कॅप्टन यश ढूलसह (Yash Dhull) 6 जणांना कोरोनाची लागण झाली होती. U19 World Cup : 7 भारतीय खेळाडूंना नाकारली होती एन्ट्री, स्पर्धेनंतर झाला मोठा खुलासा अंडर 19 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून टीम इंडियाच्या त्रासाला सुरूवात झाल्याची माहिती लॉबजंग यांनी दिली. भारतीय टीम दुबईहून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी वर्ल्ड कप विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा फास्ट बॉलर रवी कुमार, ओपनर अंगकृष रघूवंशी यांच्यासह 7 खेळाडूंना कोरोना व्हॅक्सिन न घेतल्यानं विमानतळावरूनच परत जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआय आणि आयसीसीशी चर्चेनंतर टीम मॅनेजमेंटनं या प्रकरणात मार्ग काढला. भारत आणि त्रिनिदाद सरकारलाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.