मुंबई, 26 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन टीम पेन (Tim Paine) यानं मानसिक आरोग्याचं कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. पेन आता विकेट किपर म्हणून देखील अॅशेस सीरिजमध्ये खेळणार नाही. पेननं महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर कॅप्टन पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यानं शुक्रवारी टीममधूनही नाव मागं घेतलं आहे. पेनच्या या निर्णयामुळे त्याचं क्रिकेट करिअर समाप्त झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आठवडाभरात Game Over
टीम पेन अगदी आठवडाभरापूर्वीपर्यंत ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा (Australia Test Team) कॅप्टन होता. पण 19 नोव्हेंबरच्या सकाळी त्याच्या करिअरला मोठा धक्का बसला. टीम पेननं त्या दिवशी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली. 'मी आज ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी सोडत आहे. हा एक अवघड निर्णय असला तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे.' असे पेननं जाहीर केलं. चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याला पाठवलेल्या अश्लील मेसेज प्रकरणात पेननं हा राजीनामा दिला आहे. त्याचा हा राजीनामा स्विकारण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं.
'माझ्या राजीनाम्याचे कारण चार वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. त्यावेळी मी एका सहकाऱ्याला मेसेज केले होते. त्या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियानं चौकशी केली. मी या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. त्या प्रकरणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं. माझी या प्रकरणातून मुक्तता झाली. मला त्या घटनेबद्दल तीव्र खेद होता, आजही आहे. मी त्यावेळी माझी पत्नी आणि कुटुंबाशी चर्चा केली त्यांनी मला माफ केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.' असे पेनने सांगितले होते.
IND vs NZ: श्रेयसच्या शतकानंतर वाढली कॅप्टनची अडचण, विराट परतल्यानंतर कुणाला करणार बाहेर?
ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कॅप्टन
टीम पेनच्या जागी ऑस्ट्रेलियानं पॅट कमिन्सची (Pat Cummins) ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. तो यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. अनुभवी स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम पेन ब्रेकनंतर कधी क्रिकेटमध्ये परतणार हे स्पष्ट नाही. तसंच त्याचं वय देखीाल त्याच्या पुनरागमनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे पेनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द आता संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, Tim paine