मुंबई, 1 डिसेंबर: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौरा अनिश्चित आहे. दोन्ही देशांमधील पहिली टेस्ट 17 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी 9 किंवा 10 डिसेंबर रोजी टीम इंडिया रवाना होणे अपेक्षित आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हायरंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी सध्या आफ्रिकेशी संपर्क तोडला आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या निवडीवरही (Team India Selection) त्याचा परिणाम झाला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्ट संपल्यानंतर लगेच टीम इंडियाची या दौऱ्यासाठी निवड होणे अपेक्षित होते. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमुळे ही निवड सध्या स्थगित करण्यात आली आहे, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलं आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर आहेत. या सर्वांची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड निश्चित आहे. या सर्वांना अद्याप बीसीसीआयच्या सूचनेची प्रतीक्षा आहे. बायो-बबलच्या बाहेर असणाऱ्या सर्व खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी 8 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे.
गांगुलीने दिले स्पष्टीकरण
बीससीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'दक्षिण आफ्रिका दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी अद्याप वेळ आहे. पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे. या विषयावर आम्ही विचार करू. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा ही बीसीसीआयची नेहमीच पहिली प्राथमिकता आहे. येत्या काही दिवसांमध्ये काय-काय होते ते आम्ही ठरवणार आहोत.' असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Omicron ची दहशत! टीम इंडियाच्या खेळाडूला दक्षिण आफ्रिकेत न पाठवण्याचा BCCI चा निर्णय
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर त्यांना संपूर्ण सुरक्षित अशा बायो-बबलमध्ये ठेवण्यात येईल असं आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतरही इंडिया A टीमचा नियोजित दौरा वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेनं या निर्णयाची देखील प्रशंसा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india