मुंबई, 3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) सामना होणार आहे. अफगाणिस्ताननं या स्पर्धेत आत्तापर्यंत 2 मॅच जिंकल्या आहेत. तर टीम इंडियाच्या विजयाची पाटी अजूनही कोरी आहे. ही मॅच जिंकून सेमी फायनलची दावेदारी मजबूत करण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न असेल. टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी अफगाणिस्तानच्या टीममध्ये बदल करण्यात आला आहे.
माजी कॅप्टन असगर अफगानच्या जागी ऑल राऊंडर शराफुद्दीन अशरफचा (Sharafuddin Ashraf) अफगाणिस्तानच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या टी20 वर्ल्ड कप तांत्रिक समितीनं या बदलासाठी परवानगी दिली आहे. असगर अफगान नामिबियाच्या मॅचनंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याच्या जागी शराफुद्दीनला टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यानं आजवर 17 वन-डे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याचा यापूर्वी राखीव सदस्य म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला होता.
असगर अफगान हा आंतराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धोनीपेक्षाही यशस्वी कॅप्टन आहे. त्यानं अफगाणिस्तानकडून 6 टेस्ट, 114 वन-डे आणि 74 आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं 44 च्या सरासरीनं 440 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.वन-डे क्रिकेटमध्ये त्यानं 25 सरासरीनं 2424 रन केले असून यामध्ये एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 इंटरनॅशनलमध्ये 22 च्या सरासरीनं 1351 रन काढले असून यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
IND vs AFG: विराट सलग तिसऱ्या मॅचमध्ये बदलणार Playing 11, रोहितला नवी जबाबदारी!
बुधवारी होणारी मॅच ही अफगाणिस्तानपेक्षा टीम इंडियासाठी अधिक महत्त्वाची आहे. टीम इंडियानं ही मॅच गमावली तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये 2 मॅच झाल्या असून या दोन्ही मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. 2010 साली 7 विकेट्सनं तर 2012 मध्ये 23 रननं टीम इंडियानं अफगाणिस्तानचा पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket news, T20 world cup